
आरकेसी कंपनीकडून नुकसान भरपाई
कासा, ता. ४ (बातमीदार) : रस्त्याच्या कामासाठी टेकडीवरील दगड फोडण्यासाठी केलेल्या स्फोटामुळे उडालेल्या दगडांनी गंजाडजवळील कोहराई पाडा येथील ४३ घरांचे नुकसान झाले होते. ब्लास्ट निष्काळजीपणे केल्याचा आरोप नागरिकांनी केला होता. त्यानंतर नुकसानभरपाई दिल्यानंतरच पुढील काम सुरू करू देण्यात येईल, असा इशारा ग्रामपंचायतीकडून देण्यात आला होता. त्यामुळे आरकेसी कंपनीने ४३ घरांना तीन लाखांच्या आसपास भरपाई दिली.
गंजाडजवळील कोहराई पाडा परिसरात बडोदरा-मुंबई एक्स्प्रेससाठी रस्त्याचे काम सुरू आहे. ३१ जानेवारी रोजी टेकडीवरील दगड फोडण्यासाठी स्फोट घडवून आणण्यात आला होता. यातून उडालेल्या दगडांमुळे जवळपास ४३ घरांचे नुकसान झाले होते. नुकसानग्रस्त नागरिकांनी ग्रामपंचायतीमध्ये याबद्दल तक्रार केली. सरपंच अभिजित देसक, उपसरपंच कौशल कामडी, ग्रामविकास अधिकारी किरण पाटील यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. त्यानंतर नुकसानग्रस्तांना भरपाई देण्याची मागणी त्यांनी आरकेसी कंपनीच्या ठेकेदारांकडे केली. त्यामुळे आरकेसी कंपनीच्या वतीने नुकसानग्रस्तांना जवळपास तीन लाख रुपये देण्यात आले. त्यानंतर पुढील कामास सुरुवात झाली.
दरम्यान, ही घटना निष्काळजीपणामुळे घडल्याचे सरपंच अभिजित देसक यांनी सांगितले. यापुढे काम करताना सावधानता बाळगली जाईल, असे आरकेसी प्रा.लि.चे मॅनेजर वाय. वाघेला यांनी सांगितले.