
देव आहे देवाऱ्यारत...
नवीन पनवेल ः वार्ताहर
सध्या बहुमजली इमारतींमधील आकर्षक घरे दृष्टीस पडतात. मात्र, जरी एकीकडे अपार्टमेंट संस्कृती वाढत असली तरी दुसरीकडे देव्हाऱ्याचे महत्त्व आजही कायम आहे. त्यामुळे घर लहान असो वा मोठे, प्रत्येक घराला तुळस आणि देव्हाऱ्याशिवाय शोभा नसल्याने ‘देव आहे देव्हाऱ्यात...’ असे म्हणण्याची वेळ आली आहे.
-------------------------------------
आजकाल आकर्षक घरांची क्रेझ वाढली आहे. यासाठी लाखो रुपये खर्च केले जातात. पनवेल, वाशी, नवी मुंबई शहरांत आकर्षक असे गृहप्रकल्प उभे राहिले आहेत. या घरांचे वेगळेपण जपण्यासाठी हजारांपासून लाखो रुपयांपर्यंतची देव्हारे (देवघर) मिळत आहेत. यापूर्वी चार भिंती बांधून पूजाघर बांधून घेतले जात होते. मात्र, सध्या चारी बाजूने लाकडाचा वापर करून पूजाघर बांधून घेतले जात आहे. प्रत्येक लाकडाचे वैशिष्ट्य असते. शहरातील कलाकार ग्राहकांच्या मागणीनुसार उंची, रुंदी, पाहिजे त्या प्रकारचे लाकूड वापरून देव्हारा बनवून देतात. कोणत्या देवाला कोणत्या पद्धतीचे मंदिर हवे, त्याची शास्त्रानुसार उभारणी केली जाते. देव्हाऱ्यावर कळस व चिन्हांचा वापरही केला जातो. देव्हारा उभारणीसाठी आंबा, शिसम, हसन, फणस, सागवान लाकडाचा वापर केला जातो. सम-विषम संख्येत देव्हारा उभारला जातो. नवी मुंबईमध्ये लाकडी देव्हाऱ्याचा विचार केल्यास ५ हजारांपासून ते लाखांहून अधिक किमतीचे देव्हारे आहेत. मंदिराच्या मॉडेलचा वापर करूनही काही ठिकाणी देव्हारे बनवून दिले आहेत. आकर्षक देव्हारा बनविणाऱ्या कारागिराला लाकडात देव्हारा बनविण्यासाठी तीन ते सहा महिन्यांचा कालावधी लागतो.
----------------------------------
सागवानचा वापर
देव्हारा बनविण्यासाठी लाकडाचा वापर अधिक होतो. कीड लागत नाही, यासाठी सागवान लाकूड वापरले जाते. सध्या चांगले देवघर बनवून घेण्याकडे अनेकांचा कल आहे.
-------------------------------
देव्हाऱ्यामुळे घरातील वातावरण चांगले राहते. घर लहान असो वा मोठे, देव्हारा हा असतोच. सध्या लाकडात देव्हारा बनवून घेण्याची क्रेझ वाढली आहे. आतापर्यंत पनवेल नवी मुंबई परिसरात अनेक जणांनी लाकडात देव्हारा बनवून घेतला आहे.
- सागर सुतार, करागिर