
एमडीच्या साठ्यासह एकाला अटक
मानखुर्द, ता. ४ (बातमीदार) ः गोवंडीच्या संजय नगर पार्ट दोन परिसरातून शिवाजी नगर पोलिसांनी मेहताब शेख ऊर्फ नूर तोतला या तरुणाला शुक्रवारी (ता. ३) रात्री ताब्यात घेतले. त्याच्याकडून ९० हजार रुपये किमतीचा २० ग्रॅम एमडी या अमली पदार्थाचा साठा जप्त करण्यात आला. त्यानंतर त्याच्याविरोधात अमली पदार्थ विरोधी कायद्यासह विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदवून अटक करण्यात आली. शिवाजी नगर पोलिस ठाण्यातील उपनिरीक्षक बाबू बेले व प्रशांत कांबळे यांचे पथक परिसरात गस्त घालत होते. त्या दरम्यान मेहताब संशयास्पदरित्या वावरताना आढळला. पोलिसांना पाहताच त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. तेव्हा पाठलाग करून त्याला पथकाने पकडले व चौकशी केली. तसेच त्याची पंचांसमोर झडती घेण्यात आली. त्या झडतीत त्याच्याकडे अमली पदार्थांचा साठा असल्याचे आढळले. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली.