
खारघरमध्ये कंपोस्ट खतनिर्मिती प्रशिक्षण
खारघर, ता. ४ (बातमीदार) : पनवेल पालिका आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली खारघरमधील रघुनाथ विहार सोसायटीमध्ये कंपोस्ट खतनिर्मिती प्रशिक्षण पार पडले. या वेळी पद्मश्री डॉ. शरद काळे यांनी मार्गदर्शन केले.
या प्रशिक्षणामध्ये उपायुक्त सचिन पवार, गणेश शेटे, सहायक आयुक्त डॉ. वैभव विधाते, प्रभाग अधिकारी जितेंद्र मढवी, स्वच्छता निरीक्षक अतुल मोहोकर, अजय ठाकूर, कुणाल गायकवाड, रघुनाथ विहार सोसायटीचे पदाधिकारी कर्नल-रामकृष्णराव, सरस्वती इंजिनिअरिंग कॉलेजच्या प्राध्यापिका डॉ. सुनीता पाल, एनएसएसचे विद्यार्थी, खारघरमधील गुडवील सोसायटी, इतर सोसायटीमधील नागरिक यांनी सहभाग घेतला. डॉ. शरद काळे यांनी घरामधील ओल्या कचऱ्यावर २४ तासांत प्रक्रिया करून खतनिर्मिती कशाप्रकारे केली जाते, याचे मार्गदर्शन केले. या वेळी उपस्थितांना ओल्या कचऱ्याचे वर्गीकरण करून खत निर्मितीसाठी आवश्यक पदार्थांवर प्रत्यक्ष प्रक्रिया करून दाखवली. तर उपायुक्त गणेश शेटे यांनी नागरिकांना घरातील ओला कचरा फेकून न देता त्याचे कंपोस्ट खत तयार करण्यावर भर द्यावा, असे आवाहन केले. सरस्वती इंजिनिअरिंग महाविद्यालयाने यापुढे पनवेल महापालिकेच्या विविध उपक्रमांमध्ये, जनजागृती कार्यक्रमात सहाय्य करण्याचे आश्वासन दिले.