
कांदिवलीकरांनी अनुभवली वानराची मज्जा
कांदिवली, ता. ४ (बातमीदार) ः महावीर नगर परिसरात के. टी. सोनी मार्गावर एक वानर चक्क रस्त्यावर उभ्या असलेल्या चारचाकी वाहनांवर बसले होते. वानर पाहून व्यावसायिक, स्थानिक नागरिक आणि प्रवाशांनी पाहण्यासाठी गर्दी केली. प्राणीप्रेमींनी तसेच फळे विक्रेत्यांनी वानराला केळी, पेर दिले; तर काहींनी चणे-शेंगदाणे टाकले. वानर मस्त आस्वाद घेत पसार झाले. ही गोष्ट गुरुवारी (ता. २) घडली.
के. टी. सोनी मार्गांवरील महावीर दर्शन इमारतीमधून बाहेर येताच टूनकर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कारच्या टपावर उडी मारून वानर बसले. काळे तोंड, बारीक किलकिल्या डोळ्यांनी बघणारे आणि जवळपास चार फूट लांबलचक शेपटी हलवत वानर ये-जा करणाऱ्या गाड्या, प्रवासी न्हाहाळू लागले. बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि बघता बघता व्यावसायिक, स्थानिक आणि प्रवासी जमा झाले. ते सर्व वानराकडे कुतूहलाने पाहत होते. काही फोटो काढण्यात दंग झाले; तर काही वानराला केळी फळे आणि चणे शेंगदाणे देत होते. वानरदेखील आवडीने स्वीकारून फळांचा आस्वाद घेत होते. त्यातील काही प्रवाशांनी सांगितले की, गेले महिनाभर हा एकता नगर, आदर्श नगर, डहाणूकर वाडी आणि महावीर नगर परिसरात फिरत आहे.
राष्ट्रीय संजय गांधी उद्यानात कॉल केला असता, तुम्ही त्याला खायला देऊ नका. तो पुन्हा जंगलात येईल. त्याला फळांची तसेच इतर स्वाल्टी आणि चवदार पदार्थ मिळाल्याने तो तेथेच फिरत राहणार, असे आवाहन केले होते. मात्र नागरिक काहीना काही देत होते. अखेर पोट भरल्यानंतर टुणकन उडी मारून वानर रस्ता ओलांडून दिसेनासे झाले.