वज्रेश्वरीतून जीवघेणी खडी वाहतूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वज्रेश्वरीतून जीवघेणी खडी वाहतूक
वज्रेश्वरीतून जीवघेणी खडी वाहतूक

वज्रेश्वरीतून जीवघेणी खडी वाहतूक

sakal_logo
By

वज्रेश्वरी, ता. ४ (बातमीदार) : अंबाडी-शिरसाड राज्य मार्ग क्रमांक ८१ वर राजरोसपणे डम्परची बेकायदा वाहतूक सुरू आहे. खडी व डांबराने ओव्हरलोड भरून डम्पर अवैधरीत्या भरमसाठ वेगाने या मार्गातून दिवस-रात्र वाहतूक करीत असतात. याबाबत स्थानिक गणेशपुरी पोलिस ठाण्याने या डम्परवर कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विभाग अध्यक्ष सुनील देवरे यांनी केली आहे.

वज्रेश्वरी, गणेशपुरी मार्गावर छुप्या रस्त्याने या भागातील, तसेच वाडा तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैधरित्या उत्खनन होऊन दगड, माती, कच, खडी ओव्हरलोड करून डम्पर व हायवा सुसाट वेगाने वाहतूक करीत असतात. या भागात मोठ्या संख्येने शाळा, महाविद्यालये, अंगणवाडी व इतर शैक्षणिक केंद्रे आहेत. त्यामुळे या भागात आजूबाजूच्या खेड्यापाड्यांतील गोरगरीब आदिवासींची मुले, मुली शिक्षणासाठी येतात. ही शैक्षणिक संकुले बहुतांश रस्त्याकडेलाच आहेत. त्यामुळे या सुसाट डम्परमुळे आजपर्यंत कित्येक अपघात झाले आहेत; तर काही विद्यार्थ्यांना आपला जीवही गमवावा लागला आहे. तशी नोंदही गणेशपुरी पोलिस ठाण्यात आहे. तरी या प्रकरणाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष न करता यावर कठोर कारवाई करण्यात यावी. ही जीवघेणी वाहतूक तात्काळ बंद करावी, बेकायदेशररीत्या वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कायदेशीर कारवाई करावी, अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असा इशारा सुनील देवरे यांनी दिला.

------------------
एका डम्परमधून सहा ब्रासची वाहतूक
खडी वाहतूक करणारी वाहने साधारण तीन ब्रासची परवानगी घेऊन सहा-सहा ब्रासची वाहतूक करतात. प्रशासनाला हाताशी घेऊन एकाच रॉयल्टीच्या पावतीवर दिवसातून अनेक फेऱ्या या गाड्या मारत असतात. डम्पर ओव्हरलोड भरल्याने संपूर्ण महामार्गावर धूळ आणि खडीचा जीवघेणा थर रस्त्यावर पडलेला असतो. त्यामुळे अपघातांचे प्रमाण या भागात वाढले आहे.

-------------
गणेशपुरी पोलिस ठाणे हद्दीतील सर्व दगडखाणी मालकांना १४९ प्रमाणे नोटीस पाठवण्याचे काम चालू आहे. तसेच येथील वाडा हद्दीतून ओव्हरलोड येणाऱ्या वाहनांवर केलठण पूल व अंबाडी नाका या ठिकाणी पोलिसांची नेमणूक करून कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
- धर्मराज सोनके, सहायक पोलिस निरीक्षक, गणेशपुरी पोलिस ठाणे