ऐटीत उभा झापांचा मंडप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ऐटीत उभा झापांचा मंडप
ऐटीत उभा झापांचा मंडप

ऐटीत उभा झापांचा मंडप

sakal_logo
By

अभय आपटे, रेवदंडा
दोन-अडीच वर्षे कोरोनाचा प्रादुर्भावामुळे अनेकांनी विवाह सोहळे घरगुती किंवा नोंदणी पद्धतीने पार पाडले. यावर्षी मात्र तुळशी विवाह झाल्यानंतर लग्नसराईला वेग आला आहे. अनेक जण सभागृह, निसर्गरम्य कॉटेज, रिसॉर्टमध्ये विवाह सोहळा पार पडत आहेत. त्यात ग्रामीण भागात घरासमोर किंवा मंदिराच्या दर्शनी भागात मंडप सजवून विवाह सोहळा पार पाडण्याची क्रेझ दिसत आहे. विशेष बाब म्हणजे यात आधुनिक साहित्य मंडपासाठी न वापरता कल्पवृक्षाच्या ओल्या झापांपासून प्रवेशद्वार ते अगदी स्टेज बनवण्याची कलाकृती, आकर्षक रचना लक्षवेधक ठरली आहे.

अलिबाग तालुक्यातील चौल भाट गल्लीतील राकेश काठे हा हरहुन्नरी युवक नाविन्याचा शोध घेऊन रोजगारनिर्मितीचा प्रयत्न करत असतो. असाच एक नावीन्यपूर्ण प्रयोग त्याने एका विवाह घरी केला आहे. एकीकडे पूर्वी श्रीफळाचा पाडा पडला की तोडल्या जाणार्‍या झापापासून झाडू काढले जायचे. सुक्या झापापासून झाडू व पावसापासून संरक्षण मिळवण्यासाठी विणलेल्या झापांचा छतासाठी वापर केला जायचा. पण आता या झाप विणकामावर अवकळा आली आहे. ते म्हणजे झापांची घरे शाकारणीऐवजी प्लास्टिक कापड, ताडपत्री, विविध प्रकारचे पत्रे या सर्वांनी केली जात आहेत. नाविन्याचा ध्यास घेतलेल्या राकेशने झापांना झळाळी दिली असून, नैसर्गिक वातावरणात विवाह सोहळा अनुभवता यावा, अशी कलाकृती साकारली आहे.
सुमारे ४० फूट लांब व ३० फूट रुंद आकाराच्या मंडपाला सुमारे ५० ते ६० झाप लागतात. त्यातच दहा बाय दहाचे प्रवेशद्वार बनले जाते. सुमारे ४० किलो झेंडूची फुले वापरून माळा बांधून प्रवेशद्वार ते स्टेजपर्यंत संपूर्ण कलात्मक बनवले. यामुळे सावली आणि आल्हाददायक वातावरण वाटत असल्याचे मत विवाहाचे यजमान निता परूळेकर (५८, मूळ रा. मुंबई) यांनी व्यक्त केले. मुंबईऐवजी चौलमध्ये विवाह सोहळा करण्याची इच्छा वधू व वर यांची होती. मुळात हिंदू संस्कृतीमध्ये घरात विवाह सोहळे असले की, शुभ कार्यक्रम असल्यावर प्रवेशद्वार फुले व आंब्याच्या डहाळ्यांनी सजवला जातो. त्यात अगदी निसर्गाच्या सानिध्यात असल्यासारखे केळी, फुलांच्या माळा व झापांची आरास यामुळे आलेली सर्वच पाहुणे नवीन उर्जा घेऊनच परतले, अशी प्रतिक्रिया परूळेकर यांनी या मंडपाबाबत दिली.

निसर्गाच्या सान्निध्यात रममाण होण्यासाठी सर्वच जण धडपडत असतात. युवकांनी नैसर्गिक साधनसंपत्तीला नवीन लूक दिला, तर रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वास व्यक्त केला. शिवाय विवाह किंवा एखादा कार्यक्रम झाल्यावर झापांचे झाडू काढल्यास त्यांनाही मागणी आहे.
- राकेश काठे