
ठाण्यात विवाहितेचा मानसिक छळ
भिवंडी ता. ४ (बातमीदार) : विवाहितेने माहेरहून २ लाख रुपये आणण्यासाठी सासरच्या मंडळींनी विवाहितेचा मानसिक छळ करून घटस्फोटाची धमकी देत मारहाण केल्याने विवाहितेने सासरच्या मंडळींविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. भिवंडीतील एका विवाहित महिलेने तिची सासरची मंडळी २०१३ पासून तिला माहेरहून दोन लाख रुपये आणावेत अन्यथा घटस्फोट देण्याची धमकी देत असल्याचा आरोप तक्रारीत केला आहे. तिने २०१३ ते २०२२ पर्यंत निमूटपणे हा अन्याय सहन केला; परंतु पती व सासरच्या मंडळींच्या स्वभावात काहीही बदल न झाल्याने आणि सासरच्या सर्वांनी आपापसात संगनमत करून सदर महिलेला शिवीगाळ करून मारहाण करत घराबाहेर हाकलून दिल्याने अखेर या महिलेने शुक्रवारी (ता. ३) पती रवी बालय्या अड्डागटला, सासू गौरवा बालय्या अड्डागटला, सासरा बालय्या अड्डागटला, दीर श्रीनिवास बालय्या अड्डागटला या सासरच्या मंडळीविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास शहर पोलिस करत आहेत.