अखेर ११२ जोडप्यांना मिळाले अनुदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अखेर ११२ जोडप्यांना मिळाले अनुदान
अखेर ११२ जोडप्यांना मिळाले अनुदान

अखेर ११२ जोडप्यांना मिळाले अनुदान

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

ठाणे, ता. ४ : ठाणे जिल्ह्यातील आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून हा लाभ देण्यात येत असतो. मात्र, मागील ३ ते ४ वर्षांपासून शासनाकडून अनुदान प्राप्त न झाल्याने ४९६ जोडपी लाभापासून वंचित होते. याबाबत वृत्त प्रसिद्ध होताच सन २०१९ - २० मधील ११२ जोडप्यांना या योजनेचा लाभ मिळाला असल्याची माहिती समाजकल्याण विभागाच्या वतीने देण्यात आली.
जातीयवादाची दरी कमी करण्यासाठी राज्य शासनाने ऑगस्ट २००४ मध्ये आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजना सुरू केली. या अंतर्गत देण्यात येणाऱ्या रकमेपैकी अर्धी रक्कम विवाहितांच्या नावाने अल्पबचतीत गुंतवण्यात येत होती, तर उर्वरित रकमेचे संसारोपयोगी साहित्य दिले जात होते. वाढती महागाई आणि बदलत्या काळानुसार पंधरा हजार रुपयांची रक्कम अत्यंत कमी असल्याने यामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. पंधरा हजार रुपयांवरून ही रक्कम पन्नास हजार करण्यात आली आहे. अस्पृश्यता निवारण्याच्या योजनेचा एक भाग म्हणून आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी आर्थिक साह्य देण्याची योजना शासनाच्या वतीने राबवण्यात येत आहे. आंतरजातीय विवाह योजना ठाणे जिल्हा परिषदेच्या वतीने देखील प्रभावीपणे राबवण्यात येत आहे. असे असले, तरी शासनाकडून अनुदान प्राप्त न झाल्यामुळे एप्रिल २०१९ ते मार्च २०२० पासून ते एप्रिल २०२२ ते मार्च २०२३ या कालावधीतील आंतरजातीय विवाह योजनेतील ४९६ लाभार्थी आजतागायत लाभापासून वंचित असल्याची बाब समोर आली. याबाबतचे वृत्त ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध करण्यात आले होते. त्यानंतर २०१९-२० मधील ११२ लाभार्थ्यांना ५० हजारप्रमाणे अनुदानाचा लाभ देण्यात आला असल्याची माहिती ठाणे जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाच्या वतीने देण्यात आली.

-----------------
लाभार्थी वंचित
ठाणे जिल्ह्यातील एप्रिल २०२० ते मार्च २०२१ पासून ते एप्रिल २०२२ ते मार्च २०२३ या कालावधीतील आंतरजातीय विवाह योजनेतील लाभार्थी आजतागयात लाभापासून वंचित आहेत. त्यामुळे या लाभार्थ्यांनादेखील लवकरात लवकर लाभ मिळावा, अशी मागणी करण्यात येत आहे.