बस स्थानकातील वेडिंग मशीन गायब | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बस स्थानकातील वेडिंग मशीन गायब
बस स्थानकातील वेडिंग मशीन गायब

बस स्थानकातील वेडिंग मशीन गायब

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ८ : पॅडमेन चित्रपटात प्रमुख भूमिका निभावणाऱ्या अभिनेता अक्षय कुमारने एसटी महामंडळाच्या मुंबई सेंट्रल बस स्थानकावर सॅनिटरी वेंडिंग मशीनचे उद्घाटन केले होते. तत्कालीन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी मुंबई विभागातील महिला स्वच्छतागृहात या मशीन लावल्या होत्या. महिलांच्या मासिक पाळीत त्यांना त्यांच्या सोयीनुसार सॅनिटरी पॅड उपलब्ध करून देत महिलांची कुचंबणा थांबवण्याचा प्रयत्न त्यावेळी करण्यात आला होता. मात्र, आता या मशीन मुंबई विभागातील डेपोतून गायब झाल्या आहेत.
एसटी महामंडळाच्या प्रवासामध्ये महिला प्रवाशांची सर्वाधिक संख्या आहे. त्यामुळे अत्यंत अल्प दरात सॅनिटरी पॅड उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सरकारतर्फे २०१८ मध्ये करण्यात आला होता. या मशीनध्ये १० रुपयांचा कॉइन टाकल्यास पॅड मिळत असे. मात्र, या मशीन शौचालयातून गायब झाल्या असून काही ठिकाणी भंगार अवस्थेत नादुरुस्त भिंतीला टांगून ठेवण्यात आल्या आहेत. राज्य एसटी कामगार संघटनेनेसुद्धा एसटी महिला कर्मचाऱ्यांच्या प्रतीक्षागृहात महिला कर्मचाऱ्यांसाठी वेंडिंग मशीन लावण्याची मागणी त्याचवेळी केली होती. मात्र, त्याकडे एसटी प्रशासनाने अद्याप लक्ष दिले नसल्याचा आरोप राज्य एसटी कामगार संघटनेच्या महिला पदाधिकारी शीला नाईकवाडे यांनी केला आहे.

महिला वाहक या ड्युटी करीत असताना मासिक पाळीच्या वेळी त्यांना पॅड्स बदलण्याच्या बाबतीमध्ये अनेक अडचणी उद्‌भवतात. त्यासाठी आम्ही प्रशासनास सॅनिटरी वेंडिंग मशीन द्या म्हणून वारंवार मागणी करूनही अद्यापपर्यंत या मागणीची दखल घेतली जात नाही, ही दुर्दैवी बाब आहे. आता चालक महिलापण सेवेत रुजू होत आहेत. त्यामुळे चालक, वाहक महिला कर्मचारी आणि महिला प्रवासी यांच्या आरोग्याचा विचार करून सॅनिटरी वेंडिंग मशीनची सुविधा तात्काळ देण्याबाबत प्रशासनाने पावले उचलावीत.
- शीला नाईकवाडे, संघटक सचिव, राज्य महिला एसटी कामगार संघटना

गेल्या २०१९ पासून आम्ही महिला चालकपदाचे प्रशिक्षण घेत अहोत. त्यामुळे आम्हाला प्रत्येक डेपोमध्ये जावे लागते. यामध्ये काही समस्या येतात. डेपोमध्‍ये महिलांच्‍या स्वच्छतागृहात खूपच घाण असते. मासिक पाळी आली की स्वच्छतेच्या बाबतीत खूपच वाईट अनुभव येतात. कित्येक ठिकाणी पाणी नसते, साफ सफाई नसते आणि हे कोणाला व कसे सांगावे ते पण कळत नाही.
- वैशाली तायडे, महिला चालक तथा वाहक प्रशिक्षणार्थी

प्रत्येक डेपोत, बसस्थानकात व महिला विश्रांतीगृहात सॅनिटरी वेंडिंग मशीन बसवा, अशी मागणी केली आहे; परंतु प्रशासनाने ती मान्य केली नाही. आगारात व विभागात महिलांचा हा खूप नाजूक प्रश्न आहे. हे मशीन असणे खूप गरजेचे आहे; परंतु प्रशासनाकडे वारंवार मागणी करूनदेखील या मागणीकडे दुर्लक्ष केले जात आहे.
- आशा घोलप, केंद्रीय उपाध्यक्षा, राज्य एसटी कामगार संघटना