
बेकायदा प्रवासी वाहतूक रडारवर
खारघर, ता. ५ (बातमीदार) : तळोजा फेज दोनमध्ये वसाहतीत मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरू आहेत. त्यामुळे तळोजा गाव, तळोजा वसाहत आणि पापडीचा पाडा परिसरात वास्तव्य करणारे नागरिक खारघर येथून रेल्वेने प्रवास करण्यासाठी खासगी प्रवासी वाहनांचा वापर करत आहेत; पण या वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक होत असल्याने खारघर वाहतूक पोलिसांनी ५० वाहनांवर कारवाई केली आहे.
खारघर रेल्वे स्थानकावर नवी मुंबई महापालिकेच्या परिवहन विभागाकडून एनएमएमटी बस वेळेवर येत नसल्यामुळे तळोजा आणि काही बाहेरील वाहनचालकांची तळोजा येथील शीघ्र कृती दल ते बेलपाडा खारघर मार्गांवर मोठ्या प्रमाणात प्रवासी वाहने सुरू केली आहेत. या वाहनांमध्ये सहा प्रवाशांची वाहन क्षमता आहे. पण त्यापेक्षा जास्त प्रवासी वाहतूक होत असल्यामुळे तसेच बेलपाडा गाव मेट्रो पुलाखाली आणि शीघ्र कृती दलासमोरील सिग्नल यंत्रणेसमोरील रस्त्यावर वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे खारघर वाहतूक शाखेतील पोलिस पथकाने बेलपाडा आणि शीघ्र कृती दल येथील इको टॅक्सी स्टँडवर क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई केली आहे. यावेळी पोलिसांनी अचानक केलेल्या कारवाईमुळे वाहनचालकांनी एकत्र येऊन वाहतूक अधिकाऱ्यांवर दबाव आणण्याचादेखील प्रयत्न केला. मात्र चालकांची मनमानी खपवून घेणार नसल्याचा इशारा देत नियम पाळण्याचे आवाहन केले आहे.
------------------------------
तळोजा शीघ्र कृती दल ते खारघर बेलपाडा दरम्यान मोठ्या प्रमाणात प्रवासी वाहने सुरू आहेत. या वाहनचालकांकडून नियमांचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे अशा वाहनांवर दंडात्मक कारवाई केली आहे.
- योगेश गावडे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, वाहतूक शाखा, खारघर