
मोडीलिपी संवर्धनासाठी राऊत दाम्पत्याचे समर्पण
विरार, ता. ६ (बातमीदार) : महाराष्ट्र प्रांताच्या गौरवशाली इतिहासाची साक्ष व भारतातील प्रत्येक राज्यातील गेल्या किमान ७०० वर्षांचा लिखित इतिहास जपणारी मोडी लिपी आता काहीशी दुर्लक्षित झाली आहे. या मोडी लिपीचा प्रचार आणि प्रसार करण्याचे काम वसईतील श्रीदत्त राऊत आणि त्यांच्या पत्नी दिव्या राऊत करत आहेत. गेल्या काही वर्षांत फेसबुक, व्हॉट्सअपच्या माध्यमातून विविध लिपी वर्गांची उपयुक्तता व माहिती विषयक प्रसार करण्यावर राऊत दाम्पत्य भर देत आहेत.
२००८ मध्ये इतिहास अभ्यासक श्रीदत्त नंदकुमार राऊत यांनी सुरू केलेले मोडी लिपी प्रशिक्षण वर्ग १५ वर्षे अविरत सुरू आहेत. श्रीदत्त राऊत यांनी पालघर जिल्ह्यातील विस्मृतीत गेलेल्या मोडी लिपीस ध्येयाने व त्यात सातत्याने नवा बदल, संशोधन, प्रगतीची बीजे जोडली ही बाब कौतुकास्पद आहे. न्यू इंग्लिश स्कूल वसई शाळेचे मुख्याध्यापक माणिकराव दोतोंडे यांनी मोडी लिपी प्रशिक्षण वर्गासाठी जागा उपलब्ध करून देऊन साथ दिली आहे.
राऊत यांचा मोडी वर्ग प्रशिक्षण वर्गाचा सुरू करण्याचा मानस म्हणजे उत्तर कोकणातील गडकोट, मंदिरे, ऐतिहासिक घटना, परकीय राजवटीत लुप्त झालेला इतिहास याबाबत प्राथमिक मोडी लिपी अस्सल साधनांतून इतिहास लेखन व संशोधन करणे हा होय. गेल्या काही वर्षांत केवळ दुय्यम साधने, आख्यायिका, स्थानिक वर्णने, माहात्म्य, बखरी, कथा, दंतकथा, लेख इत्यादीवर आधारित इतिहास लेखन पूर्णपणे चित्र स्पष्ट करीत नाहीत हे लक्षात ठेवून राऊत यांनी मूळ कागदपत्रे शोधून संकलित करण्यासाठी तब्बल गेली १५ वर्षे शोधमोहीम घेतली. यात विष्णुप्रिया कुलकर्णी, प्रवीण कुलकर्णी, तेजस्वी कुलकर्णी या मान्यवरांनी नियमितपणे सहकार्य केले आहे.
--------
ऐतिहासिक दस्तावेजांचे संकलन
आजवर तुंगारेश्वर देवस्थान, निर्मळ विमल देवस्थान, गोखिवरे देवस्थान, जंजिरे वसई कोट, जंजिरे अर्नाळा भवानी देवी मंदिर, वसई प्रांतातील पेशवेकालीन घडामोडींची साक्षीदार गावे, १८ व्या शतकातील एका लग्नाची गोष्ट, श्री वज्रयोगिनी वज्रेश्वरी देवस्थान, जंजिरे अर्नाळा दिल्ली दरवाजा, जंजिरे अर्नाळा बुरुज नामावली, माहीम केळवे देवस्थान नेमणुका, मल्हारगड कागदपत्रे, आसावा दुर्ग, श्री महालक्ष्मी देवस्थान डहाणू, सेवगा गड डहाणू, भवानगड भवनीगड इत्यादी कागदपत्रांचा नव्याने शोध घेऊन इतिहास संशोधनात व संकलनात मोलाचे योगदान दिले आहे.
-----------
मोडी लिपीचे संशोधनपर पुस्तक
जिल्ह्यातील पहिले मोडी लिपीविषयक संशोधनपर पुस्तक प्रकाशित झाले आहे. श्रीदत्त राऊत यांनी सातत्याने मोडी कागदपत्रे यांचे मराठी भाषांतर उपक्रम सुरू ठेवला आहे. मंडळाच्या विशेष उपक्रमात गेल्या वर्षी राजा शिवछत्रपती यांचे आज्ञापत्र मराठी व मोडी या दोन्ही पद्धतीने पुन्हा लिहून पूर्ण नवीन प्रती तयार करण्यात आल्या. राऊत यांनी उत्तर व दक्षिण कोकणातील जुन्या सर्व मोडी सनदा पत्रांचे वाचन व लेखन नुकतेच एक वर्ष सातत्याने परिश्रम घेऊन पूर्ण केले आहे.