
सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाचा गुणगौरव समारंभ
पालघर, ता. ८ (बातमीदार) : विद्यार्थ्यांना त्यांच्या अपेक्षित क्षेत्रात यशस्वी व्हायचे असेल, तर कठोर मेहनतीशिवाय पर्याय नाही. तसेच विद्यार्थ्यांनी कौशल्याधारित अभ्यासक्रमांच्या आधारे विविध व्यवसायात पदार्पण करावे आणि आपला ठसा उमटावा, असे आवाहन आमदार मनीषा चौधरी यांनी सोनोपंत दांडेकर कनिष्ठ महाविद्यालय आयोजित वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाच्या कार्यक्रमात केले. महाविद्यालयात शैक्षणिक व सहशैक्षणिक उपक्रम स्पर्धा तसेच क्रीडा स्पर्धांमध्ये विशेष गुणप्राप्त विद्यार्थ्यांचा या कार्यक्रमात पारितोषिक देऊन गुणगौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष जी. डी. तिवारी यांनी संस्थेचे कार्य व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी करण्यात येणाऱ्या विविध योजनांबद्दल माहिती दिली. कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक गोपीनाथ नागरगोजे यांनी प्रास्ताविक केले. प्राचार्य डॉ. किरण सावे यांनी महाविद्यालयातील विविध उपक्रमांबद्दल माहिती दिली. या वेळी संस्थेचे उपाध्यक्ष धनेश वर्तक, सचिन कोरे, कोषाध्यक्ष हितेंद्र शहा, सचिव प्रा. अशोक ठाकूर व अतुल दांडेकर, कनिष्ठ व्यवस्थापन कमिटीचे कार्याध्यक्ष प्रकाश संख्ये व संस्थेचे सदस्य, कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा. अरुण सुरती, प्रीती फणसेकर, क्रीडा सांस्कृतिक मंडळाच्या कार्याध्यक्ष लीना पाटील, उपकार्याध्यक्ष प्रा. अनिता लोहार, शिक्षक, शिक्षकेत्तर सहकारी, विद्यार्थी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. स्वानित पाटील यांनी केले.