
जुगारात हरल्याने स्वतःच्या अपहरणाचा बनाव
कोवीड काळामध्ये दप्तराची जागा मोबाईलने घेतली. मोबाईलमुळे ज्ञानाबरोबर इतरही विघातक गोष्टी विद्यार्थ्यांपर्यंत सहज पोहोचल्या आहेत. सध्या ऑनलाईन रमी जुगाराच वेड लहानांपासून मोठ्यापर्यंत लागले असून त्यात अनेकजण कर्जबाजारी झाले आहेत. तर काहींनी टोकाची पावले उचलली आहेत. असाच काहीसा प्रकार खालापूर तालुक्यात घडला असून रमीच्या विळख्यात पैसे गमावलेला अल्पवयीन मुलगा अचानक घर सोडून गेला आणि अपहरण नाट्य रंगले.
अंधार पडू लागला तरी आदित्य घरी परतला नव्हता. त्यामुळे त्याच्या आईने पती गुणाजीजवळ चिंता व्यक्त केली. यावेळी मीच त्याला एटीएममधून पैसे काढण्यासाठी पाठवल्याचे सांगून गुणाजी पुन्हा टीव्हीवरील मॅच पाहण्यात रंगून गेला. रात्रीचे साडेआठ वाजले तरी आदित्य न आल्याने गुणाजीलाही चिंता वाटू लागली.
सोळा वर्षाचा आदित्यला बाईक चालवण्याचे वेड होते. बाईक मिळणार असेल तर कोणतेही काम करण्यास तो एका पायावर तयार व्हायचा. एटीएममध्ये जाण्यासाठी बाईक देणार असेल तर जातो, असे सांगून आदित्य गेला होता. त्यामुळे गुणाजीच्या मनात नको नको त्या शंका येऊ लागल्या. आदित्यचा मोबाईलही बंद येत असल्याने गुणाजी जागेवरून उठला. नाक्यावर मित्रांमध्ये बसलाय का बघून येतो, असे सांगून घाईघाईत घराबाहेर पडला.
नाक्यावर मित्रांकडे चौकशी करत असतानाच गावातला सलूनवाला दत्ताने आवाज दिला. आणि आदित्यने बाईकची चावी आणि एटीएम कार्ड घरी देण्यास सांगितले, असे सांगून गुणाजीकडे सोपवले. मात्र कुठे जातो, याबाबत दत्ताला प्रश्न केला असता, त्याने नकारार्थी मान हलवली. कोणाबरोबर मॅच पाहायला गेला असेल मित्रांना फोन करून पाहावा म्हणून आदित्यच्या मित्रांना गुणाजीने फोन लावला. परंतु सर्वजण घरी होते. आता मात्र गुणाजीचे पाय लटपटायला लागले. कसाबसा धीर करत त्याने त्याचा भाऊ ज्ञानेश्वरला फोन करून नाक्यावर बोलावून घेतले. दोघांनी थेट पोलिस ठाणे गाठले. आमचा मुलगा हरवलाय, त्याचा फोनही लागत नाही, काकुळतीला येत गुणाजी बोलला. हवालदार संतोष रुपनवर यांनी दोघांना बसण्यास सांगितले. आदित्यचा फोटो, सर्व माहिती घेतल्यानंतर रुपनवर यांनी फौजदार शिरीष पवार यांच्या कानावर सर्व प्रकार घातला. आदित्यच्या मोबाईलचे शेवटचे लोकेशन तपासा अशा सूचना फौजदार पवार यांनी दिल्या.
तातडीने हवालदार रुपनवर कामाला लागले, तोपर्यंत गावामध्ये आदित्यचे अपहरण झाल्याची बातमी पसरली आणि आदित्यचे मित्रही पोलिस ठाण्यात पोचले. आदित्यचे लोकेशन मुंबई दाखवत असल्याची माहिती रुपनवर यांनी दिली. त्यापाठोपाठ शोध मोहीम सुरू करण्यात आली. हवालदार संतोष रुपनवर, विकास पाटील, आदित्यचे वडील आणि काका मुंबईच्या दिशेने रवाना झाले. आदित्यचा कॉल लागला होता, परंतु त्यांनी लगेच कट केला, अशी माहिती गुणाजीने रुपनवर यांना दिली. त्यानंतर पुन्हा नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून आदित्यच्या नवीन लोकेशनची माहिती घेतली.
आदित्य मुंबईत आझाद मैदान परिसरात असल्याची माहिती मिळाली. तोपर्यंत रात्रीचे दीड-दोन वाजत आले होते. आझाद मैदान परिसरात पोलिसांची गाडी पोहचली तशी गुणाजीची नजर आदित्यला शोधत होती. साहेब, थांबवा गाडी, तो आदित्यच आहे, असे म्हणत गाडी थांबताच गुणाजी मुलाकडे धावत निघाला. गुणाजीने आदित्यला मिठी मारली. दोघांच्याही डोळ्यातून अश्रूच्या धारा सुरू होत्या. हवालदार रुपनवर यांनी गुनाजीला, आता काही विचारत बसू नका, घरी चला असा इशारा केला. आदित्य सापडल्याची बातमी रुपनवर यांनी फौजदार पवार यांना दिली. आपल्याला काहीच आठवत नसल्याचे सांगत कोणीतरी भूल देऊन मुंबईला आणले, असे आदित्य सांगत होता. गुणाजीराव निवांत घरी जा, उद्या आदित्यला घेऊन पोलिस ठाण्यात या, असे रुपनवर बोलले. तोपर्यंत आदित्य खोटं बोलतोय, याची कल्पना पोलिसांना आली होती. परंतु नक्की काय घडलं हे तोच सांगणार होता.
तरुण जुगाराच्या विळख्यात
दुसऱ्या दिवशी फौजदाराने आदित्यला विश्वासात घेऊन चौकशी केल्यानंतर, ऑनलाईन रमी जुगारात पैसे हरल्याचे त्याने सांगितले. वडिलांनी पैसे काढून आणण्यास सांगितल्यानंतर खात्यात पैसेच नसल्याने कुठून आणणार, जुगारात पैसे हरल्याचे कसे सांगणार, या भीतीने आपण घर सोडून गेल्याची कबुली आदित्यने दिली. आदित्य हा एकमेव नसून त्याच्यासाठी अनेक मुले ऑनलाईन रमी जुगाराचा विळख्यात अडकून भरकटत असल्याचे या वेळी समोर आले.