८१ टक्के कर्करोगग्रस्तांना निदानाची भीती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

८१ टक्के कर्करोगग्रस्तांना निदानाची भीती
८१ टक्के कर्करोगग्रस्तांना निदानाची भीती

८१ टक्के कर्करोगग्रस्तांना निदानाची भीती

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. ७ : निदान झाल्यानंतर कर्करोगावर प्राथमिक स्तरावर उपचार केल्यास रुग्ण त्यातून बाहेर येऊ शकतो. या गंभीर आजारावर थेट उपचारपद्धती नसल्याने रुग्णांना विविध चाचण्यांतून सामोरे जावे लागते. त्यामुळे कर्करोगाच्या निदानाबाबत रुग्णांच्या मनात भीती कायम असते. फोर्टिस कॅन्सर इन्स्टिट्यूटतर्फे करण्यात आलेल्या सर्वेक्षणातही ही बाब प्रकर्षाने जाणवली. मुंबईतील जवळपास ८१ टक्के रुग्ण कर्करोगावरील उपचारांना घाबरत असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे.

कर्करोगाबाबत रुग्णांचे वर्तन समजून घेण्यासाठी फोर्टिस कॅन्सर इन्स्टिट्यूटतर्फे सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणात कर्करोगाच्या विविध प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक बाजूंवर उत्तरे मिळवण्यात आली. यात कर्करोगावर लवकर निदान, आजाराची तपासणी, आजाराची माहिती, साथीच्या काळात कर्करोगग्रस्तांना भेडसावणारी आव्हाने, विम्याची गरज आणि सर्वोत्तम कॅन्सर केअर अशा प्रश्नांवर ४,३५० मुंबईकरांशी संवाद साधण्यात आला. यावेळी ८१ टक्के लोकांनी निदानाची भीती ही वेळेत तपासणी आणि वेळेवर उपचारांशी संबंधित मोठी समस्या असल्याचे सांगितले.

कर्करोगाचे निदान होण्याची भीती मनात कायम असूनही ८३ टक्के प्रतिसादकर्त्यांनी दीर्घकाळ तंबाखू सेवन, अनारोग्यदायी आहार आणि कौटुंबिक इतिहासामुळे कर्करोगाचा धोका वाढत असल्याची जाणीव असल्याचे कबूल केले; तर ३ टक्के जणांनी कर्करोगासाठी कौटुंबिक इतिहास कारणीभूत असल्याचे सांगितले. ७८ टक्के जणांनी कर्करोगाचे निदान लवकर झाल्यास तो उपचार करण्यायोग्य असल्याचे सांगितले. ९ टक्के प्रतिसादकर्त्यांनी कर्करोगाचे निदान लवकर झाले तरी त्यावर उपचार करता येत नसल्याचे सांगितले. ४९ टक्के जणांच्या मते कर्करोग म्हणजे मृत्यू; तर ५१ टक्के जणांच्या मते कर्करोगावर वेळेवर निदान उपयुक्त ठरू शकतात. तसेच ७२ टक्के जणांच्या मते कौटुंबिक इतिहासाकडे दुर्लक्ष करून पुरुष आणि महिलांनी कर्करोग तपासणीला समान महत्त्व दिले.

वेळेत तपासणी आवश्यक
-९० टक्के प्रतिसादकर्त्यांना लवकर तपासणी कर्करोग ओळखण्यात मदत करू शकते याची जाणीव होती.
- ८० टक्के लोकांच्या मते ४० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या प्रत्येकासाठी कर्करोग तपासणी करणे आवश्यक आहे.
-१६ टक्के जणांच्या मते कौटुंबिक कर्करोगाचा इतिहास असेल तरच वेळेवर तपासणी करणे आवश्यक आहे.

कर्करोगग्रस्तांनी काळजी घेणे हा या सर्वेक्षणाचा मुख्य उद्देश आहे. यात रुग्णांना भेडसावणाऱ्या आव्हानांचा विचार करण्यात आला आहे.
सर्वेक्षणात २८ टक्के नागरिकांनी कर्करोगाबाबत जनजागृती गरजेचे असल्याचे सांगितले. २६ टक्के नागरिकांनी उपचार परवडणारे असावेत, असे सांगितले.
- डॉ. बोमन धाभर, कर्करोग तज्ज्ञ