
बँकेची फसवणूक करणारा अटकेत
अंधेरी, ६ (बातमीदार) : बोगस सोने देऊन बँकेची फसवणूक करणाऱ्याला गोरेगाव पोलिसांनी अटक केली आहे. धर्मेद्र बच्चन यादव असे अटक व्यक्तीचे नाव आहे. या गुन्ह्यात त्याच्यासोबत इतर १४ जण सहभागी असल्याचे पोलिसांनी सांगितले. १४ खातेदारांनी बनावट सोने तारण ठेवून त्याद्वारे कर्ज घेऊन मॉर्डन सहकारी बँकेची १ कोटी ६७ लाख रुपयांची फसवणूक केल्याचे आतापर्यंत तपासात उघडकीस आले आहे.
गोरेगाव येथील मॉर्डन सहकारी बँकेने १२ जुलै ते नोव्हेंबर २०२१ या कालावधीत १४ खातेदारांना सुवर्ण कर्ज दिले होते. त्या वेळी सपना भट या बँकेतील गोल्ड व्हॅल्यूअर कर्मचारीने काम पाहिले होते. खातेदारांनी बनावट दागिने दिले असताना तिने ते दागिने खरे असल्याचे प्रमाणपत्र देऊन खातेदारांना कर्ज देण्यासाठी बँकेस प्रवृत्त केले होते. हा प्रकार उघडकीस येताच बँकेने गोरेगाव पोलिस ठाण्यात सपनासह जितेंद्र भोसले, मीनाक्षी मारु, धर्मेद्र यादव, क्षीतिज धामणे, अतुल सावंत, सचिन चिवटे, नितून यादव, कयूर वरवटकर, विक्रांत राठोड, वैशाली धामणे, हिना धामणे, रक्षा किरमानी, महेंद्र भार्गव, प्रियांका कुबल आदींविरोधात तक्रार दाखल केली. यापूर्वीही काही आरोपींना पोलिसांनी अटक केली असून वॉण्टेड आरोपींचा शोध सुरू आहे.