
खारघरमध्ये कांदळवनांच्या कत्तली
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. ६ : मत्स्य शेतीच्या नावाने दिवसाढवळ्या खाडी किनारपट्टीवर असणारी कांदळवने जाळण्याचे सत्र खारघर परिसरात सुरू आहे. सायन-पनवेल महामार्गालगत असणाऱ्या खाडीकिनारी खारघरजवळ काही दिवसांपासून अज्ञात लोकांकडून कांदळवनांवर रसायने टाकून जाळण्याचा सपाटा लावला आहे. मत्स्य निर्मितीसाठी तलावात खाडीचे पाणी खेचण्यासाठी तलाव करून पर्यावरणाची हानी करण्याचे काम वेगाने सुरू आहे.
सायन-पनवेल महामार्गाच्या एका बाजूला खाडीकिनारी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम वेगाने सुरू आहे. त्यामुळे या परीसरातील कांदळनांवर नियंत्रण आले आहे. या भागातील बेकायदा मत्स्य शेती करणारे आता खारघर आणि रोडपाली परिसरातील खाडी भागाकडे वळले आहेत. खाडीच्या आतील भागातील कांदळवने मारून त्याठिकाणी होणाऱ्या मोकळ्या जागेवर खड्डे केले जातात. या खड्ड्यांमध्ये भरतीचे पाणी आले की, त्या पाण्यामध्ये मासळीचे उत्पादन घेऊन शेजारच्या बाजारपेठांमध्ये विक्री करणे सोयीचे जाते. त्यासाठी खारघरजवळील खाडी परिसर मोक्याचे ठरत आहे. सध्या खारघर टोलनाक्याच्या शेजारच्या कांदळवनांमध्ये आणि याठिकाणाहून पोलिस आयुक्तालयाच्या शेजारच्या खाडीकिनारी मोठ्या प्रमाणात कांदळवनांवर घातक रसायनांचा मारा करून कांदळवने जाळण्याचा प्रयत्न झाला आहे. रसायने टाकल्यानंतर येथील हिरवीगार कांदळवने काळी पडून आपोआप जळून जात आहेत. आता येथील कांदळवने सुकून गेल्याने आतमध्ये मोकळा परिसर निर्माण झाला आहे.
पर्यावरणप्रेमींकडून नाराजी
खारघर खाडी परिसरातील मागील काही दिवसांपासून अतिक्रमण केले जात आहे, ते पाहता येथील कांदळवनांबाबत अनेकदा पर्यावरण प्रेमींकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. तसेच वनविभागाकडे पत्र व्यवहारसुद्धा केला आहे. मात्र त्या पत्रावर तात्पुरती कारवाई केल्यानंतर पुन्हा कांदळवने नष्ट करण्याचे सत्र सुरू होत असल्याने पर्यावरणप्रेमींकडून नाराजी व्यक्त होत आहे.