
आरोग्य शिबिरास नागरिकांची गर्दी
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ७ : बाळासाहेबांची शिवसेना कल्याण ग्रामीण विभागाच्या वतीने सोमवारी विनामूल्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत हे शिबिर भरविण्यात आले होते. सकाळपासूनच नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेण्यासाठी गर्दी केली होती. हजारो नागरिकांनी डोळे व कान तपासत मोफत चष्मा व श्रवणयंत्राचा लाभ घेतला.
कल्याण ग्रामीण भागातील होरायझन सभागृहात बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे कल्याण तालुकाप्रमुख महेश पाटील यांच्या वतीने एकदिवसीय मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी मधुमेह चाचणी, ईसीजी, डोळे तपासणी, रक्त तपासणी, त्वचारोग, बालरुग्ण आदी विभागामार्फत रुग्णांची तपासणी करण्यात आली. तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत आरोग्य तपासणी केल्यानंतर मोफत औषधांचे वाटपही रुग्णांना करण्यात आले. डोळे तपासणी केलेल्या रुग्णांना चष्मावाटप व श्रवणाचा त्रास असणाऱ्या नागरिकांना श्रवणयंत्राचे वाटप या वेळी करण्यात आले. या शिबिरास माजी नगरसेविका डॉ. सुनीता पाटील, सायली विचारे, माजी नगरसेवक योगेश म्हात्रे, केडीएमटी माजी सदस्य बंडू पाटील, सुजित नलावडे आणि पदाधिकारी उपस्थित होते. हजारो नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेत आरोग्य चाचणी या वेळी करून घेतली.