
रोटरी क्लबतर्फे चेक डॅमची निर्मिती
विक्रमगड, ता. ७ (बातमीदार) : रोटरी क्लब ऑफ मुंबई डाऊन टाऊन सी.लँडतर्फे विक्रमगड आणि डहाणू तालुक्यामध्ये पाच चेक डॅमचे भूमिपूजन करण्यात आले. या भागात पावसाळ्यात प्रचंड पाऊस पडत असतो. मात्र पाणी साठवण्याची व्यवस्था नसल्याने पाणी वाहून जाते. परिणामी उन्हाळ्यात नागरिकांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. पण आता उभारण्यात येणाऱ्या या बंधाऱ्यांचा उपयोग शेतीसाठी तसेच जनावरांना पाणी पिण्यासाठी होणार आहे. आदिवासी भागात हे बंधारे बांधून १२ महिने शेतीमध्ये भाजीपाला लागवडीतून येथील जीवनमान सुधारण्यास मदत होईल, असा रोटरीचा मानस आहे. यावेळी रोटरीतर्फे अध्यक्ष डॉ.सरोज वर्मा, चंद्रा कोणा, प्रीती शाज, अजय कासोटिया, आगर लाला व डॉ. अरुण सावंत हे उपस्थित होते. स्थानिक युवक प्रणव, भाविन व सरपंच दर्शना वैद्य उपस्थित होते. सर्व गावकरी या कामात सहभागी झाले. हे चेक डॅम चारी बुद्रुक, कासा बुद्रुक व पिंपळशेत येथे बांधण्यात येत आहेत, अशी माहिती रोटरीचे जिल्हा समन्वयक भगवान पाटील यांनी दिली.