
अंबरनाथमधील विकासकामे मार्गी लावा
अंबरनाथ, ता. ७ (बातमीदार) : अंबरनाथ व उल्हासनगरमधील विविध विकासकामांसंदर्भात आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांची भेट घेतली. या वेळी कामे मार्गी लावण्याचे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. अंबरनाथमधील पालेगाव आणि फणसीपाडा या गावातील वाढती लोकसंख्या लक्षात घेता या गावांची हद्दवाढ करण्यात यावी, अशी मागणी स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच नागरिकांकडून होत आहे.
पालेगाव आणि फणसीपाडा या गावांलगत शासनाच्या मालकीच्या असलेल्या गायरान जमिनीचा गावठाणात समावेश करून या गावांची हद्दवाढ झाल्यास गावांचा विस्तार होऊन मूलभूत सुविधा पुरवणे नगरपरिषदेस शक्य होऊ शकेल, अशी भूमिका आमदार डॉ. किणीकर यांनी या वेळी मांडली. याबाबतचा प्रस्ताव शासनास सादर करण्याचे जिल्हाधिकारी शिनगारे यांनी किणीकर यांना आश्वासन दिले आहे.
----------------------
विरंगुळा केंद्रासाठी सूचना
अंबरनाथमधील ज्येष्ठ नागरिकांकरिता वडवली विभागातील शासनाच्या मालकीच्या व सूर्योदय सोसायटीचा विनावाटप असलेला भूखंड ज्येष्ठ नागरिकांकरिता जिल्हा नियोजन समितीमार्फत विरंगुळा केंद्र उभारण्यासाठी द्यावा अशी मागणीही आमदार डॉ. किणीकर यांनी केली. त्यानुसार महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियान जिल्हास्तर योजनेअंतर्गत विरंगुळा केंद्र उभारण्यासंदर्भात आवश्यक अंदाजपत्रक सादर करण्याच्या लेखी सूचना जिल्हाधिकारी शिनगारे यांनी अंबरनाथ नगरपरिषद मुख्याधिकारी यांना दिल्या आहेत.