बोनसरीतील विद्यार्थ्यांच्या पायपीटला पूर्णविराम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बोनसरीतील विद्यार्थ्यांच्या पायपीटला पूर्णविराम
बोनसरीतील विद्यार्थ्यांच्या पायपीटला पूर्णविराम

बोनसरीतील विद्यार्थ्यांच्या पायपीटला पूर्णविराम

sakal_logo
By

नवी मुंबई, ता.७ (वार्ताहर): नवी मुंबईतील बोनसरी गावातील विद्यार्थ्यांना तुर्भे गावातील डॉ.सामंत विद्यालयात ये-जा करण्यासाठी चालत किंवा रिक्षाने प्रवास करावा लागत होता. त्यामुळे स्त्री मुक्ती संघटनेकडून एनएमएमटीच्या माध्यमातून मुलांसाठी स्कूल बसची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे बोनसरीतून तुर्भ्याच्या शाळेत विद्यार्थ्यांची होणारी पायपीट अखेर थांबली आहे.
तुर्भे स्टोअर्स नजीकचा दगडखाण विभाग म्हणून परिचित असलेल्या बोनसरी गावात पायाभूत सुविधांचा अभाव आहे. या गावात रस्ता, शाळा, दवाखाना, स्कूल बस अशा सुविधा नसल्याने स्त्री मुक्ती संघटनेने कचरा वेचक महिलांच्या आठ बचत गटांच्या माध्यमातून विविध उपक्रम केले जात आहेत. यात गॅलेक्सी सरफॅक्टॅन्ट्स् लिमिटेड या कंपनीच्या मदतीने परिसरातील ५७ मुलांसाठी घरी अभ्यास वर्ग सुरू केले आहेत. पण गेल्या वीस वर्षांपासून बोनसरीमध्ये बस येत नसल्याने येथील मुलांच्या पालकांना महिन्याला ६०० रुपयांचा खर्च रिक्षांसाठी करावा लागत आहे. त्यामुळे हातावर पोट असलेल्या कामगार वर्गाची परवड होत असल्याने गरीब मुलांच्या शिक्षणात कोणताही खंड पडू नये, यासाठी स्त्री मुक्ती संघटनेने एनएमएमटीचे महाव्यवस्थापक योगेश कडूसकर, वाहतूक अधिकारी अनिल शिंदे व सहाय्यक वाहतूक अधिक्षक धर्मराज भगत यांच्यासोबत बैठका घेऊन ८८ मुलांसाठी बससेवा सुरू केली आहे.
---------------------------------
स्त्री मुक्ती संघटनेने एनएमएमटीचे व्यवस्थापक योगेश कडूस्कर यांची दोनदा भेट घेऊन दगडखाण परिसरात काम करणाऱ्या कामगारांच्या मुलांना शाळेपर्यंत ने-आण करण्यासाठी स्कूल बसची व्यवस्था करण्याची विनंती केली होती. त्यानुसार एनएमएमटीने बोनसरीतील विद्यार्थ्यांसाठी बसची व्यवस्था केली आहे.
-वृषाली मगदूम, अध्यक्ष, स्त्री मुक्ती संघटना