रुग्णांना मिळणार पुस्तकांची साथसंगत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रुग्णांना मिळणार पुस्तकांची साथसंगत
रुग्णांना मिळणार पुस्तकांची साथसंगत

रुग्णांना मिळणार पुस्तकांची साथसंगत

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ७ : रुग्णालय म्हटले म्हणजे औषधांचा दर्प, रुग्णांचे विव्हळणे, नातेवाईकांच्या चेहऱ्यावर दिसणारी काळजी असेच चित्र उभे राहते. मग या तणावातून बाहेर पडण्यासाठी आणि बहुतेकदा वेळ घालवण्यासाठी अनेकजण मोबाईल हाती घेतात. अशावेळी रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना पुस्तकाची साथसंगत देण्याचा अभिनव उपक्रम कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या संकल्पनेतून रुग्णालयात लवकच वाचनालय उभारण्यात येणार आहे. प्रत्येक वॉर्डमध्ये रुग्णांसाठी वाचनालयाची सुविधा असेलच पण डॉक्टर्स, नर्स, वॉर्डबॉय यांच्यासाठीही स्वतंत्र वाचनालय उभारण्यात येणार आहे. यानिमित्ताने रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांना आणि रुग्णालय कर्मचाऱ्यांनाही पुस्तकांचा बूस्टर डोस मिळण्यास मदत होणार आहे.

ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती महाराज शिवाजी रुग्णालयात गोरगरीब, मध्यमवर्गीय कुटुंबातील रुग्ण हे विविध उपचारांसाठी येत असतात. या ठिकाणी दररोज ओपीडीसाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या ही साधारणत: दीड हजारांच्या आसपास आहे. उपचारासाठी रुग्णांना व त्यांच्यासोबत आलेल्या नातेवाईकाला नंबर येईपर्यत रुग्णांसोबत असलेल्या व्यक्तींला वेळ कसा घालवायचा हा प्रश्न नेहमीच पडतो. या फावल्या वेळेचा सदुपयोग होण्यासाठी वाचनालयाचा निश्चितच उपयोग होणार आहे. वाचनालयाचा उपक्रम हा ‘लेटस् रीड इंडिया’ या फाऊंडेशनच्या मदतीने राबविला जात आहे. वाचनसंस्कृतीचा प्रसार व्हावा यासाठी लेटस् रीड फाऊंडेशनच्या माध्यमातून राज्यभरात विविध उपक्रमाचे आयोजन केले जात असून, त्यांच्या सहकार्याने या वाचनालयाची उभारणी केली जाणार असल्याचे आयुक्त अभिजीत बांगर यांनी नमूद केले आहे.

सकारात्मक विचार देणाऱ्या पुस्तकांची मैत्री लाभणार
वाचनालयात वैद्यकीय क्षेत्रातील घडामोडी, रुग्णालय व्यवस्थापन यांच्याशी संबंधित मासिके व पुस्तके उपलब्ध असतील. एकंदर वाचनालयाच्या माध्यमातून पुस्तकांची निवड अशा पद्धतीने केली जाणार आहे, ज्यातून रुग्णांची मानसिकता सकारात्मक राहील असा प्रयत्न करण्याकडे भर असेल. ज्याचा अप्रत्यक्षपणे परिणाम त्यांच्या तब्बेतीवर सकारात्मकपणे होऊ शकेल. पुस्तकांच्या निवडीमध्ये बहुभाषिक पुस्तके, सकारात्मक विचार- प्रसार करणारी पुस्तके, विनोदी पुस्तके, स्वत:ची काळजी कशी घ्यावी (सेल्फ हेल्थ) आदी माहितीपर अशी पुस्तके ठेवली जाणार आहेत. आकर्षक स्वरुपात वाचनालयाची मांडणी करणार असल्यामुळे रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येकाला या वाचनालयात जाऊन पुस्तक हाती घ्यावेसे वाटेल, असा विश्वासही आयुक्त बांगर यांनी व्यक्त केला आहे.

इतर आरोग्यकेंद्रातही वाचनालये सुरू करणार
‘पुस्तके सांगतात गोष्टी युगायुगाच्या..’ ‘वाचाल तर वाचाल’ पण आजच्या धावपळीच्या जगात पुस्तके वाचावयास वेळ मिळत नाही. अनेकांना आर्थिक परिस्थितीअभावी पुस्तके विकत घेणे परवडत नाही. यासाठी सर्वात प्रथम छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात ही संकल्पना प्रत्यक्षात साकारण्यात येत असून, टप्याटप्याने महापालिकेच्या इतरही आरोग्यकेंद्रात वाचनालये सुरू करण्याचे प्रशासनाच्या विचाराधीन आहे.
- अभिजित बांगर, पालिका आयुक्त, ठाणे