मीटर रिकॅलिब्रेशन मुदत वाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मीटर रिकॅलिब्रेशन मुदत वाढ
मीटर रिकॅलिब्रेशन मुदत वाढ

मीटर रिकॅलिब्रेशन मुदत वाढ

sakal_logo
By

वसई, ता. ७ (बातमीदार) : मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाने १६ जानेवारीपासून मीटर रिकॅलिब्रेशन न केल्यास प्रतिदिन पन्नास रुपये दंड आकारला होता. याविरुद्ध ऑटो रिक्षा टॅक्सी चालक-मालक महासंघाने पालघर जिल्ह्यात एक दिवसाच रिक्षा बंद पुकारला होता. या आंदोलनाला यश आले असून ३१ मार्चपर्यंत मीटर रिकॅलिब्रेशन करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. तसेच ३१ मार्चपर्यंत दंडआकारणी केली जाणार नसल्याने दंडाचा भुर्दंड सहन करावा लागणार नाही.
वाढती महागाई व सीएनजीचे वाढलेले दर याचा विचार करून रिक्षा संघटनेने रिक्षा टॅक्सी भाडे दरात वाढ करण्याची मागणी केली होती. याबाबत २६ सप्टेंबर रोजी झालेल्या बैठकीत रिक्षा टॅक्सी भाडेवाढीला मंजुरी देण्यात आली. त्यानुसार १ ऑक्टोबरपासून रिक्षा टॅक्सी भाडेवाढीची अंमलबजावणी करण्यात आली. भाडे दरवाढीच्या अनुषंगाने परिचालन पद्धतीने रिकॅलिब्रेशन करण्यासाठी मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाने मुदतवाढ देण्यात आली होती; तरीदेखील शंभर टक्के रिक्षांचे रिकॅलिब्रेशनच काम पूर्ण झाले नव्हते.
पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील जिथे शेअर रिक्षा पद्धत सुरू आहे, त्या ठिकाणी मीटर रिकॅलिब्रेशन शंभर टक्के करण्यात आले नव्हते. त्यामुळे १६ जानेवारीपासून त्यांना या दंडात्मक कारवाई सुरू करण्यात आली होती. या विरोधात ऑटो रिक्षा टॅक्सी चालक-मालक महासंघाने आंदोलनाचा पावित्र्यात घेतला होता. तसेच महासंघासह खासदार राजेंद्र गावित यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे परिवहन विभागाचे प्रधान सचिव यांनी बैठक घेत ३१ मार्चपर्यंत मीटर रिकॅलिब्रेशनला मुदतवाढ दिली आहे. तसेच दंडात्मक कारवाईलादेखील स्थगिती दिली. मात्र यानंतरदेखील जे रिक्षा चालक-मालक रिकॅलिब्रेशन करणार नाहीत, त्यांना एप्रिल महिन्यापासून पन्नास रुपये दंडात्मक केली जाणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
----------------------
रिक्षाचालकांच्या एकजुटीचा विजय
रिक्षा मीटर रिकॅलिब्रेशन न करणाऱ्यांवर आकारण्यात येणाऱ्या पन्नास रुपये दंडात्मक कारवाईच्या विरोधात जिल्हा बंद करण्यात आला होता. या वेळी पालघर जिल्ह्यातील सर्व रिक्षा संघटनेचे पदाधिकारी, रिक्षा चालक मालक या अन्यायकारक कारवाईविरोधात एकवटले. त्यामुळे प्रशासनाला भूमिका बदलावी लागली, हे आंदोलनाचे व रिक्षा चालकांचे यश आहे, असे ऑटो रिक्षा टॅक्सी चालक-मालक महासंघाचे अध्यक्ष विजय खेतले यांनी सांगितले.