वरसावे पुलाची रखडपट्टी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वरसावे पुलाची रखडपट्टी
वरसावे पुलाची रखडपट्टी

वरसावे पुलाची रखडपट्टी

sakal_logo
By

वसई, ता. ७ (बातमीदार) : घोडबंदर येथील वरसावे खाडी पुलावरून मुंबई आणि गुजरात दिशेने जाणाऱ्या वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते. मात्र जुना पूल नादुरुस्त होत असल्याने नव्या पुलाची बांधणी करण्‍यात येत आहे. परंतु, अद्यापही या पुलाचे काम अपूर्णावस्थेत असल्याने या भागातील कोंडी फुटून मोकळ्या मार्गावरून प्रवास कधी करता येणार याची प्रतीक्षा नागरिकांना करावी लागत आहे.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक आठ महाराष्ट्र प्राधिकरणाकडे आहे. या मार्गावरील महत्त्वाचे जंक्शन असलेल्या वरसावे भागात मुंबई, ठाणे, गुजरात भागातून येणाऱ्या वाहनांची मोठी वर्दळ असते. मोठे-मोठे वाहतूक करणारे कंटेनर, ट्रक यांसह हलकी वाहने ये-जा करत असतात. रेल्वेचा प्रवास न करता अनेक वाहनेही रस्ते मार्गाचा वापर करत असतात. त्यामुळे वसई-भाईंदर खाडीवरील वरसावे पुलावरून दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. मात्र, जुना पूल कमकुवत झाला असल्याने नवा पूल असावा यासाठी नव्या पुलाची निर्मिती करण्यास प्राधान्य देण्यात आले.
नव्याने बांधण्यात येत असलेल्या या पुलावरून चार मार्गिका तयार करण्यात येणार आहेत. यासाठी एकूण २४७ कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित धरण्यात आला असून, लांबी सव्वा दोन किमी इतकी असणार आहे. हा पूल फेब्रुवारी महिन्यात रहदारीसाठी खुला करण्यात येणार होता. परंतु, अद्यापही याचे काम पूर्ण न झाल्याने हा पुलावरून प्रवास करण्यासाठी मार्च महिना उजाडणार की अधिक अवधी लागणार हे मात्र स्पष्ट झालेले नाही.
--------------------------------------
वाहतूक व्यवस्था सुरळीत
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना कामाला गती आली नव्हती. त्यानंतर पुलाचे काम करण्यासाठी यंत्रणा, कामगार काम करत आहेत. एकीकडे खाडीवरचा हा पूल मुंबई-गुजरात वाहतूक व्यवस्थेला व दळणवळणासाठी अत्यंत महत्त्‍वाचा दुवा मानला जातो. जर नवा पूल लवकरात लवकर सुरू झाला तर येथील वाहतूक व्यवस्था सुरळीत होणार आहे. त्यामुळे प्रवासी पुलाची प्रतीक्षा करत आहेत.
--------------------
वरसावे पुलाची पाहणी केली होती काम लवकर करावे यासाठी संबंधित विभागाला सूचना दिल्या होत्या. या पुलामुळे वाहतुकीची समस्या निकाली निघेल. काम पूर्ण व्हावे म्हणून पुन्हा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणासमवेत बैठक घेण्‍यात येईल.
-राजेंद्र गावित, खासदार
-------------------
घोडबंदर येथील वरसावे पुलाच्या कामाचा आढावा वारंवार घेतला जात आहे. काही अडचणी येत असतील तर त्याची पाहणी सुरू आहे. पुढील आठवड्यात एक बैठक घेऊन कामाची स्थिती लक्षात घेतली जाणार आहे.
-मुकुंदा अत्तरदे, प्रकल्प संचालक, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण
--------------------
मुंबईकडे जाण्यासाठी प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. नवा पूल लवकर खुला झाला तर सोईचे होणार आहे. अंतर पार करताना कोणतीही अडचण येणार नाही.
-दीपक नाईक, प्रवासी
-----------------------
मुंबई, गुजरातला जोडणारा जुना पूल अनेकदा दुरुस्तीसाठी बंद ठेवण्यात येत होता; तर आता नव्याने चार मार्गिका असलेल्या पुलाचे काम खोळंबले आहे. त्यामुळे प्रवास करताना अक्षरशः त्रासदायक ठरत आहे.
-जयेश पाटील, प्रवासी