ओव्हरलोड वाहतुकीमुळे मोऱ्यांना भागदाडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ओव्हरलोड वाहतुकीमुळे मोऱ्यांना भागदाडे
ओव्हरलोड वाहतुकीमुळे मोऱ्यांना भागदाडे

ओव्हरलोड वाहतुकीमुळे मोऱ्यांना भागदाडे

sakal_logo
By

मनोर, ता. ७ (बातमीदार) : मुंबई-बडोदा द्रुतगती महामार्गाच्या निर्मितीसाठी माती, मुरुमाची ओव्हरलोड वाहतूक तसेच रस्त्यालगतच्या खोदकामामुळे वरई-परगाव रस्त्याची दुरवस्था झाली आहे. शिवाय या अवजड वाहतुकीमुळे नावझे आणि नगावे गावच्या हद्दीत दोन ठिकाणी मोऱ्यांना भगदाडे पडली आहेत. अवजड वाहतुकीमुळे ठिकठिकाणी रस्ता उखडला गेला आहे. मातीचा वापर करून भगदाडे बुजवल्याने अपघातांची शक्यता व्यक्त केली जात असल्याने वरई-पारगाव रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी जोर धरत आहे.
वरई-पारगाव रस्त्यामार्गे मुंबई-अहमदाबाद महामार्ग आणि सफाळे रेल्वे स्थानक जोडले गेले आहे. त्यामुळे वसई-विरार आणि मुंबईकडे जाणारे चाकरमानी या रस्त्याचा वापर मोठ्या संख्येने करतात. सफाळे पूर्वेकडील गावांमधील शेतमालाच्या विक्रीसाठी सफाळे बाजारपेठेत जाणारे शेतकरी, महाविद्यालयीन विद्यार्थी आणि सफाळे बाजारपेठेत खरेदीला जाणारे ग्राहक या रस्त्याचा वापर करीत आहेत. रस्त्यालगत मुंबई-बडोदा द्रुतगती महामार्गाचे काम सुरू झाल्याने जी. आर. कंपनीच्या वाहनांची वर्दळ वाढली आहे.
वरई-पारगाव रस्त्यालगत मुंबई-वडोदरा द्रुतगती महामार्गाचे काम सुरू झाल्याने वरई-पारगाव रस्त्यावरून जी. आर. कंपनीच्या अवजड वाहतुकीमुळे रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. जी. आर. कंपनीच्या कॅम्पमधून निघणाऱ्या वाहनांमुळे कॅम्पसमोरच्या रस्त्यावर खड्डे पडले आहेत. रस्त्यावरील खड्डे आणि उताराच्या ठिकाणी कॅम्पमध्ये अवजड वाहने वळण घेत असल्याने अपघातांची शक्यता व्यक्त केली जात आहे.


-------------------
भगदाडावर माती टाकून मलमपट्टी
वरई-पारगाव रस्त्यावर नावझे गावाच्या हद्दीत जी. आर. कंपनीच्या कॅम्पलगतची मोरी आणि नगावे गावच्या हद्दीत भगदाडे पडली होती. अपघाताची शक्यता असल्याने मातीचा वापर करून भगदाडे बुजवण्यात आली होती; परंतु अवजड वाहतुकीमुळे भगदाड पडलेल्या ठिकाणी खड्डा तयार होत आहे. दोन्ही भगदाडे वरईच्या दिशेने उतारावर आहेत. या ठिकाणी धोका दर्शवणारा फलक नसल्याने खड्डा चुकवताना वाहनचालक आणि दुचाकीस्वारांची तारांबळ उडते. अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता असल्याने मोरीची दुरुस्ती करण्याची मागणी दुचाकीस्वार आणि वाहनचालकांकडून केली जात आहे.

----------------
वरई-पारगाव रस्त्यावर मोऱ्यांची जर्जर अवस्था आहे. नावझे आणि नगावे गावांच्या हद्दीत मोऱ्या फुटून खड्डे पडले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने माती टाकून खड्डे बुजवत सारवासारव केली आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ मोऱ्यांची दुरुस्तीचे काम सुरू केले पाहिजे. वरई पारगाव रस्त्यावरील खड्डे बुजवून रस्त्याचे मजबुतीकरण करण्याची गरज आहे.
- तुषार पाटील, पंचायत समिती सदस्य, पालघर

-----------------
नावझे आणि नगावे गावाच्या हद्दीतील दोन्ही खड्ड्यांची दुरुस्ती तसेच रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे निर्देश देण्यात येतील. वरई-परगाव रस्त्याच्या मजबुतीकरणाचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.
- हेमंत भोईर, उपविभागीय अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग