डोळे तपासणी शिबिर

डोळे तपासणी शिबिर

Published on

मुलुंड, ता. ८ (बातमीदार) ः महाराष्ट्र सेवा संघ यांच्या आरोग्य विभागातर्फे मोफत डोळे तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. पद्मश्री डॉ. विकास महात्मे यांच्या ‘महात्मे हेल्थ अँड हॅप्पीनेस हॉस्पिटल’ यांच्या सहकार्याने रविवारी (ता. १२) सकाळी १० ते दुपारी २ या वेळेमध्ये हे शिबिर पार पडेल. हे शिबिर संस्थेच्या सु. ल. गद्रे सभागृहामध्ये आयोजित करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी आणि नावनोंदणीसाठी सेवा संघाच्या कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

मुलुंडमध्‍ये भजन संध्या
मुलुंड, ता. ८ (बातमीदार) ः मुंबईचे प्रथम उत्तर भारतीय महापौर आर. आर. सिंग यांच्या प्रथम स्मृतिदिवसानिमित्ताने मुलुंडमध्ये भजन संध्या आणि स्मृती भोज कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी (ता. १२) आर. आर. एज्‍युकेशन ट्रस्टच्या सभागृहामध्ये संध्याकाळी ६ ते १० या वेळेत हा समारोह होणार आहे. यानिमित्ताने मुलुंडमधील दिव्यांग व्यक्तींना सायकलचे वाटप करण्यात येणार आहे. या समारोहाला काँगेसचे ज्येष्ठ नेते संजय निरुपम, खासदार मनोज कोटक, आमदार मिहीर कोटेचा, शिवसेना नेते शिशिर शिंदे यांच्‍यासह अनेक अनेक नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. आर. आर. सिंग यांनी दिली.

मालाडमध्‍ये संयुक्त जयंतीचा उत्साह
मालाड, ता. ८ (बातमीदार) ः माता जिजाऊ, सावित्री, रमाई व फातिमा बीबी यांची संयुक्त जयंती मालवणीत विविध ठिकाणी उत्साहात साजरी केली गेली. या निमित्त आंबोजवाडी येथे इंदुताई दाहीजे आणि सर्वे ताई व इतर महिला मंडळांनी मिळून संयुक्त जयंती साजरी केली. तसेच मालवणी भीमनगर येथे लहान मुलांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांची वेशभूषा केली होती. धम्मज्योती बुद्धविहारच्‍या अध्यक्षा आसराबाई खोतकर आणि त्यांच्या महिला मंडळाने जयंती उत्‍सव जल्लोषात साजरा केला. इंदुताई दाहिजे, नारायण वारकरी, सुबोध कहाळे आणि आंबोजवाडी येथील सर्व महिलांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भरपूर योगदान दिले.

सुकन्या विवाह योजनेअंतर्गत मदतीचा धनादेश
कांदिवली, ता. ८ (बातमीदार) ः युवक मंडळाच्या सुकन्या योजनेअंतर्गत लोकमान्य टिळक नगर परिसरातील मुलींच्या विवाहासाठी श्वास चित्रपट निर्माता मोहन परब यांनी त्यांच्या मुलाच्या लग्नानिमित्त ५० हजार रुपयांचा धनादेश खासदार गोपाळ शेट्टी यांच्या हस्ते तेजस्विनी माने हिला देण्यात आला. विवाहास आर्थिक मदत मिळाल्याने माने कुटुंबीयांनी खासदार गोपाळ शेट्टी आणि चित्रपट निर्माते परब यांचे आभार मानले. युवक मंडळाच्या माध्यमातून सुकन्या विवाह योजनेअंतर्गत विवाह करणाऱ्या कन्येला आर्थिक मदत करण्यात येते. युवक मंडळ ही ८० जी मानांकन प्राप्त संस्था असल्याने, देणगीदारांना करामध्ये सूट मिळेल. बोरिवली व उत्तर मुंबईमधील दात्यांनी पुढे येऊन युवक मंडळाला या कार्यात मोठ्या मनाने सहकार्य करावे, असे आवाहन अध्यक्ष गणेश बारे यांनी केले आहे.

आयुष्यमान भारत योजनेबाबत जनजागृती
गोरेगाव, ता. ८ (बातमीदार) : गोरेगाव पश्चिम येथील तीन डोंगरी येथे मनसे वॉर्ड क्रमांक ५६ व ५८ तर्फे आयुष्‍यमान भारत योजनेबाबत जनजागृती अभियान राबवण्यात आले. या अभियानात लोकांचे आयुष्मान भारत योजनेअंतर्गत सरकारने प्रसिद्ध केलेल्या यादीनुसार आलेले नाव नोंदणीकृत करून घेण्यात आले; तसेच लोकांचे आधार कार्ड त्यांच्या इलेक्शन कार्डला लिंक करण्याचा कार्यक्रमसुद्धा राबवण्यात आला. आयुष्यमान भारत जन आरोग्य योजना व महात्मा फुले जन आरोग्य योजना यांचे एकत्रित योजना कार्ड नागरिकांना देण्यात येईल, असे मनसे कार्यकर्त्यांद्वारे सांगण्यात आले. पुढील जनसंपर्क अभियान येत्या रविवारी (ता. १२) शिवटेकडी, तानाजी नगर, क्रांती नगर, रेड्डी बिल्डिंग, मॉर्निंग स्टार आणि चामुंडा बिल्डिंगच्या रहिवाशांसाठी राबवण्यात येणार आहे.

विश्वकर्मा जयंती उत्साहात
भांडुप, ता. ८ (बातमीदार) ः भांडुप पश्चिम येथे श्री विश्वकर्मा पांचाळ सुतार समाज संस्था यांच्या वतीने शुक्रवारी (ता. ३) भगवान श्री विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या वेळी प्रमुख पाहुणे म्‍हणून समाजसेविका राजोल पाटील उपस्थित होत्या. मान्यवरांच्या हस्ते विश्वकर्मा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. युवकांनी विविध समाजोपयोगी कार्यक्रमावर भर द्यावा, असे आ‌वाहन पांचाळ सुतार समाज संस्था अध्यक्ष किशोर सूर्यवंशी यांनी केले. कार्यक्रमाला पांचाळ सुतार समाज संस्था, भांडुपचे अध्यक्ष किशोर सूर्यवंशी, उपाध्यक्ष अमित हिरे, कार्याध्यक्ष योगेश रुले, खजिनदार सूरज चव्हाण आदींची उपस्थिती होती.

‘साहित्य साधना पुरस्कार’ जाहीर
मुलुंड, ता. ८ (बातमीदार) ः महाराष्ट्र सेवा संघाच्या न. चिं. केळकर ग्रंथालयाचा ‘साहित्य साधना पुरस्कार’ जाहीर झाला आहे. मराठी साहित्यातले रुळलेले वाङ्‍मय प्रकार दूर सारून वेगळ्या अनवट विषयांवर लिखाण करणाऱ्या साहित्यिकाच्या साहित्यकृतीला हा पुरस्कार संस्थेचे माजी अध्यक्ष सु. ना. पाटणकर यांच्या आर्थिक मदतीने दिला जातो. या वर्षी ग्रंथालयाने ‘बुक्स ऑन बुक्स’ (पुस्तकांविषयी पुस्तके) हा प्रकार निवडला आहे. ‘पुस्तकनाद’ आणि ‘लीळा पुस्तकांच्या’ या अनुक्रमे जयप्रकाश सावंत आणि नितीन रिंढे यांच्या पुस्तकांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे.
ग्रंथसखाचे संस्थापक शाम जोशी या पुरस्कार सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. हा पुरस्कार सोहळा शनिवारी (ता. ११) सायंकाळी ५.३० वा. संस्थेच्या सुविधा शंकर गोखले सभागृहात आयोजित केला आहे.

नालंदा बुद्ध विहाराचे लोकार्पण
चेंबूर, ता. ८ (बातमीदार) ः चूनाभट्टी येथील राहूल नगर परिसरातील नालंदा बुद्ध विहाराचा लोकार्पण सोहळा नुकताच संपन्न झाला. या वेळी भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर व माजी नगरसेवक कप्तान मलिक प्रमुख अतिथी म्‍हणून उपस्थित होते. चूनाभट्टी येथील राहुल नगर परिसरात मोठ्या प्रमाणात बौद्ध समाज आहे. या परिसरात जीर्ण बुद्ध विहार होते. नुकतेच त्‍याचे नूतनीकरण करण्यात आले. याकरिता स्थानिक प्रतिनिधींचे मोलाचे सहकार्य लाभले होते. या वेळी प्रमुख पाहुणे व बौद्ध भिख्खू यांनी उपस्थिताना मोलाचे मार्गदर्शन केले. या मान्यवरांचा आयोजकांकड़ून सत्कार करण्यात आला.

कुमुद विद्यामंदिरात कला प्रदर्शन
मानखुर्द, ता. ८ (बातमीदार) ः देवनारच्या कुमुद विद्यामंदिरामध्ये कला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या कलादालनात पूर्व प्राथमिक, प्राथमिक तसेच माध्यमिक विभाग सहभागी झाले होते. विशेष म्हणजे प्राथमिक विभागात शिक्षण घेत असलेल्या सर्वच ८४१ विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. या दालनाला महाराष्ट्र राज्य आयकर विभागाचे प्रमुख नितीन वाघमोडे, मुंबई महापालिका एम व एल विभागाच्या निरीक्षिका भारती भवारी यांनी भेट दिली. त्यांच्यासह पालकांनी व परिसरातील नागरिकांनी या उपक्रमाचे कौतुक केले. प्राथमिक विभागाच्या माजी मुख्याध्यापिका अनघा साळवी व सुनीता कोळी यांच्या हस्ते प्राथमिक विभागाचे; तर माध्यमिक विभागाच्या विविध कलादालनाचे माजी मुख्याध्यापिका म्हापणकर, संस्थेचे विश्वस्त विलास कांबळे व शिक्षण विभागातील अधिकारी सुरवसे यांच्या हस्ते उद्‌घाटन करण्यात आले.

गोवंडीत रक्तदान शिबिर
मानखुर्द, ता. ८ (बातमीदार) ः शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त गोवंडीतील ठाकरे गटाच्या शिवसेना शाखा क्रमांक १४४ येथे नुकतेच रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शाखाप्रमुख राजेश भोगले व महिला शाखा संघटिका ममता भंडारी यांच्या पुढाकाराने हे आयोजन करण्यात आले होते. या वेळी विभागप्रमुख प्रमोद शिंदे, महिला विभाग संघटिका रिता वाघ, विधानसभा संघटक निमिष भोसले व वत्सला पाटील यांच्यासह शिवसेना व युवा सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या शिबिराचे ज्येष्ठ शिवसैनिक आत्माराम (आप्पा) केणी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या शिबिराला परिसरातील नागरिकांचा उत्‍स्फूर्त प्रतिसाद लाभला. त्यामध्ये महिलांची संख्या अधिक होती. यावेळी एकूण ७२ दात्यांनी रक्तदान केले. त्यांचा शाखाप्रमुख राजेश भोगले यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक व आकर्षक भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.