अखेर पर्यावरण अहवालाला ‘मुहूर्त’

अखेर पर्यावरण अहवालाला ‘मुहूर्त’

वसई, ता. ८ (बातमीदार) : वसई-विरार महापालिका स्थापन होऊन १३ वर्षे उलटल्यावर पर्यावरण अहवाल व उपाययोजना करण्यासाठी मूर्त स्वरूप प्राप्त झाले आहे. महापालिका क्षेत्रातील नागरीकरण झपाट्याने वाढत असताना मात्र पर्यावरण, प्रदूषणाकडे दुर्लक्ष होत होते; परंतु आता महापालिकेची पर्यावरणविषयक अहवाल तयार करण्याची लगबग सुरू झाली आहे. या अहवालातून वसई-विरार शहरातील पर्यावरणाची सद्यस्थिती राज्य शासनाला सादर केली जाणार आहे. या अहवालातून सर्वसामान्य नागरिकांसह पशू-पक्ष्यांच्या आरोग्याबाबत उपाययोजना करण्यावर भर दिला जाणार आहे.
वायू, ध्वनी, जल प्रदूषण याचे परीक्षण करून शहर प्रदूषणमुक्त ठेवण्याची जबाबदारी वसई-विरार शहर महापालिकेची आहे. पर्यावरणाबाबतचा शहरातील अहवाल राज्य शासनाला जुलैपर्यंत देणे बंधनकारक असते; परंतु कचराप्रश्‍न, शहरातील वाढते ध्वनी, वायू प्रदूषण याबाबत मात्र स्थापनेपासून पालिकेला याचा अहवाल देता आला नाही. शहरात जर प्रदूषण वाढले तर त्यावर उपाय करणे, जनजागृती करणे यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. यासाठी शहराचा सर्व्हे होणे आवश्‍यक आहे. महाराष्ट्र महापालिका अधिनियम ६७ अ नुसार पर्यावरण सद्यस्थिती अहवाल तयार करणे आवश्यक असते. त्यानुसार आता महापालिका स्थापन होऊन १३ वर्षे झाल्यानंतर शहरातील पर्यावरणाबाबत उपाययोजना आखण्यास सुरुवात करण्यात आली आहे. यासाठी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त डॉ. सागर घोलप यांनी पर्यावरणाबाबत अहवाल तयार करण्याचे काम सुरू केले आहे. हा अहवाल तयार करण्यासाठी आयआयटी या संस्थेची मदत घेतली जाणार असल्याचे घोलप यांनी स्पष्ट केले. यासाठी महापालिकेने आयआयटीसोबत तीन वर्षांचा करार केला आहे. त्यामुळे २०२४ पर्यंत पर्यावरणाबाबत माहिती एकाच संस्थेकडून मिळणे सोपे जाणार आहे.
-----------------
पर्यावरणाला घातक घटक, तसेच अन्य समस्या जाणून घेण्यासाठी पर्यावरण अहवाल तयार करण्याचे काम आयआयटीला देण्यात आले आहे. दोन महिन्यांत हा अहवाल सादर झाल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल.
- डॉ. सागर घोलप, उपायुक्त, महापालिका
----------------
उपाययोजना करण्यास मदत
वसई विरार शहरात ग्रामीण, शहरी भागासोबत औद्योगिक वसाहतीसुद्धा आहेत. तसेच शहरात अनेक ठिकाणी तबेले आहेत. याशिवाय महापालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात हॉटेल, इमारतींची कामे सुरू आहेत. यामुळे पर्यावरण अहवाल तयार करणे गरजेचे आहे. कारण या अहवालातून शहरातील तापमान, प्रदूषणाची स्थिती, हवेतील ऑक्सिजन, कार्बनडाय ऑक्साइड आणि धुलिकणांचे प्रमाण आदींची माहिती मिळू शकेल. यामुळे शहरातील पर्यावरण संवर्धनासाठी उपाययोजना आखण्यास मदत होणार आहे.
---------------
अहवालात काय असणार?
पर्यावरण अहवालात आयआयटी संस्था जमिनीतील आर्द्रता, पाणी धारण क्षमता, ध्वनी, हवा व जैवविविधता याचे प्रत्येक परिसरातून २० नमुने घेण्यात येणार आहेत. हवा बदल, प्रदूषण, जलसुरक्षा, ऊर्जा सुरक्षा या महत्त्वाच्या मुद्द्यांचा यात समावेश असेल.
---------------------------
प्रदूषणास कारणीभूत घटक
हवेत, पाण्यात मिसळणारे दूषित घटक
वाहनांचा कर्कश्श आवाज
जलस्रोतांचे संरक्षण न होणे
जैवविविधतेकडे दुर्लक्ष होणे
----------------------
हवेचा निर्देशांक समजणार
स्वच्छ हवेसाठी ५० निर्देशांक इतका असावा लागतो. मात्र तसे वसई-विरार शहरात दिसून येत नाही. महापालिकेकडे निर्देशांक मोजण्याचे यंत्र नाही. वाईट हवामानाचा परिणाम शेती लागवडीसह नागरिकांच्या आरोग्यावर होत असतो. जर पर्यावरण अहवाल समोर आला तर हवेचा निर्देशांक मोजणे व त्वरित उपाययोजना करणे शक्य होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com