पोषण आहारासाठी शिक्षकांची उसणवारी

पोषण आहारासाठी शिक्षकांची उसणवारी

Published on

खर्डी, ता. ८ (बातमीदार) : शासनाच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांना शाळेत दररोज पोषण आहार व पूरक पोषक आहार देण्याची तरतूद आहे. हा पोषण आहार बनवणाऱ्या शहापूर तालुक्यातील गोरगरीब मदतनीसांना गेल्या जून २०२२ पासून आठ महिन्यांचे मानधनच मिळाले नसल्याने त्या मदतनीसांवर उपासमारीची पाळी आली आहे. त्याशिवाय अतिदुर्गम असलेल्या आदिवासी भागात पोषण आहाराच्या खिचडीसाठी लागणारे तांदूळ अथवा कोणतेही खाद्यपदार्थ व इंधन खर्च न मिळाल्याने काही शिक्षक आपल्या खिशातून; तर काही शिक्षक दुकानदारांकडून उसनवारी करून इंधन व किराणा साहित्य आणून विद्यार्थ्यांना पोषण आहार देत असल्याचे शिक्षक सांगत आहेत.

तालुक्यातील शिक्षक लोकसहभागातून, रेशन दुकानदाराकडून उसणे धान्य घेऊन व काही ठिकाणी स्वतःच्या खिशाला कात्री लावून तात्पुरते खिचडी बनवत आहेत. विद्यार्थी उपाशी राहू नयेत, यासाठी वेळ मारून नेत आहेत. शहापूर तालुक्यातील ५११ शाळांतील पहिली ते आठवीतील अंदाजे ३३ हजारच्या आसपास विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. गरेलपाडा, कुकांबे, कळमपाडा, बावघर, दलालपाडा, ठाकूरपाडा (खाखरोली), चांग्याचा पाडा व खर्डी यासारख्या ११४ च्या आसपास शाळांना शालेय पोषण आहाराचा इंधन खर्च व मदतनीसांना मानधन मिळलेली नाही. काही शाळांना हा निधी वर्ग होतो; तर काही शाळांना हा निधी दिला जात नसल्याने शालेय पोषण आहाराच्या निधी वाटपात दुजाभाव केला जात असल्याचा आरोप शिक्षक करीत आहेत. महागाईच्या काळातही मदतनीसांना फक्त दिवसभर राबून एक हजार ५०० रुपये महिना मानधन मिळत असून तेही वेळेवर मिळत नसल्याने ते नाराजी व्यक्त करीत आहेत. हे मानधन पाच हजार रुपये करण्याची मागणी करीत आहेत.

---------------
पोषण आहार उपलब्ध नसल्याने सध्या रेशन दुकानदारांकडून उसनवारी करून विद्यार्थ्यांची सोय होत आहे. शिवाय इंधन खर्च खिशातून करत आहे.
- सुधीर भोईर, मुख्याध्यापक, भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळा, खर्डी १

----------------
गेल्या आठ महिन्यांपासून आमचे मानधन मिळाले नसल्याने आमच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. आम्हाला उधारीवर पोट भरावे लागत असल्याने आमचे मानधन लवकर मिळावे.
- कांचन इंधन, मदतनीस, शालेय पोषण आहार

--------------
तांत्रिक अडचणीमुळे पोषण आहाराचे अनुदान व मंदतनीसांचे मानधन रखडले होते; परंतु आता खात्यात निधी उपलब्ध झाला असून येत्या सात-आठ दिवसांत मानधन व इंधन खर्च त्याच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल.
- भाऊसाहेब चव्हाण, गटशिक्षणाधिकारी, शहापूर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.