पामबीच मार्गावर अपघातांना निमंत्रण

पामबीच मार्गावर अपघातांना निमंत्रण

तुर्भे, ता. ८ (बातमीदार) : नवी मुंबईतील क्वीन नेकलेस म्हणून ओळखला जाणाऱ्या पामबीच मार्गावर अपघातांचे प्रमाण वाढले आहे. गेल्या काही वर्षांपासून वारंवार अपघात होत असल्याने वाढती संख्या पाहता नवी मुंबई महापालिकेने सानपाडा येथे हलक्या वाहनांसाठी अंडरपास बांधण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, या भुयारी मार्गाच्या कामाला सुरुवातच झाली नसल्याने नागरिकांमधून नाराजीचा सूर उमटत आहे.
पामबीच मार्गाच्या रचनेमुळे सुसाट वाहन चालवण्याचा मोह वाहनचालकांना आवरत नाही. मात्र, हा मोह अनेकदा अपघातांसाठी निमित्त ठरत आहे. हे अपघात रोखण्यासाठी सिग्नलची संख्या वाढविणे, रंबलर्स बसविणे, स्पीडरोधक कॅमेरे बसवणे असे उपाय नवी मुंबई महापालिकेने केले आहेत. तसेच वेगमर्यादेवरदेखील बंधन घालण्यात आले आहे. मात्र, तरीदेखील पामबीच मार्गावर अपघातांवर आळा घालण्यात महापालिका आणि पोलिस प्रशासनाला अपयश आल्याने सानपाड्यात सेक्टर १९ येथे केशर सॉलिटायरजवळ आरसीसी बॉक्स टाईप अंडरपास बांधण्याची, मागणी माजी विरोधी पक्ष नेता दशरथ यांनी मनपाकडे केली होती. त्यानुसार या ठिकाणी भुयारी मार्ग बांधण्याची सर्व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण होऊन देखील आजमितीला काम सुरू झालेले नाही. त्यामुळे नवी मुंबई महापालिकेने सर्व निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन कार्यादेश प्रतीक्षेत असून ती पूर्ण करावे, अशी मागणी पामबीच (सोनखार) ज्येष्ठ नागरिक सेवा समितीकडून मनपा प्रशासनाकडे करण्यात आलेली आहे.
------------------------------------
वाहतूक कोंडीमुळे स्थानिक त्रस्त
सानपाडा, सेक्टर १ व १३ ते २० या क्षेत्रासाठी मोराज रेसिडेन्सीसमोर एकमेव प्रवेशद्वार आहे. तसेच सानपाडा, से. २ ते १० या क्षेत्रातील नागरिकांना मुंबई व वाशीच्या दिशेने त्वरित प्रवेश करण्यासाठी मोराज सोसायटीसमोरील शारदामाई नानासाहेब धर्माधिकारी चौकातच यावे लागते. त्यामुळे या चौकात सततच्या वाहतूक कोंडीमुळे अनेक वेळा सानपाडा नोडमधील रुग्णांना घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिका आणि आपत्कालीन परिस्थितीत अग्निशमन दलाची वाहनेदेखील अडकून पडलेली आहेत.
---------------------------------
२५ कोटींचा खर्च अपेक्षित
या भुयारी मार्गासाठी एकूण ३० हजार ३०० मीटर क्षेत्र जागा लागणार आहे. तसेच त्याची उंची साडेचार मीटर; तर रुंदी साडेनऊ मीटरची राहणार आहे. या मार्गात ५०० मीटरचा ॲप्रोच रोड बांधून पामबीचवरून सानपाड्यात प्रवेश करता येणे सोपे होऊन अपघात कमी होण्यास मदत होणार आहे. तसेच कामावर २५ कोटींचा खर्च अपेक्षित आहे.
----------------------------------
पाम बीच मार्गावरील भुयारी मार्गाचे काम पर्यावरण समाघात निर्धारण प्राधिकरणाच्या परवानगीसाठी अडले आहे. या विभागाकडून परवानगीने लवकरच काम सुरू केले जाणार आहे.
- मनोज पाटील, अतिरिक्त शहर अभियंता

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com