कस्तुरबा रुग्णालयात अद्यावत प्रयोगशाळा

कस्तुरबा रुग्णालयात अद्यावत प्रयोगशाळा

Published on

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ८ : कोविड आणि गोवरच्या प्रादुर्भावापासून धडा घेत, पालिकेने कस्तुरबा रुग्णालयात मेट्रोपॉलिटन सर्व्हिलन्स प्रयोगशाळा युनिट (एमएसयू) स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य आणि केंद्र सरकारच्या समन्वयाने या प्रयोगशाळेची स्थापना केली जाईल. या प्रयोगशाळेमार्फत डेंगा, मलेरिया, चिकनगुनिया, गोवर आणि इतर संसर्गजन्य रोगांचा प्रादुर्भाव यांसारख्या स्थानिक आजारांना प्रतिबंध, मर्यादित आणि व्यवस्थापित करण्यासाठी मदत होणार आहे. अत्याधुनिक यंत्रणांनी ही प्रयोगशाळा सुसज्ज असेल.
एमएसयू - मेट्रोपॉलिटन सर्व्हेलन्स युनिट हे भक्कम तंत्रज्ञान आणि कौशल्य यांचे मिश्रण असेल. या उच्च-तंत्रज्ञान प्रयोगशाळेत डॉक्टर, डेटा विश्लेषक आणि इतर कर्मचाऱ्यांना रोगांवर संशोधन आणि देखरेखीसाठी नियुक्त केले जाईल. वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्याने सांगितले की, एमएसयूच्या स्थापनेसाठीचे बजेट मंजुरीसाठी प्रक्रियेत आहे. एक नोडल अधिकारी नियुक्त केला जाईल, जो प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी कर्मचाऱ्यांशी समन्वय साधेल.
..............................
केंद्रासाठी जागा मंजूर
अद्ययावत प्रयोगशाळेची घोषणा मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्‍पामध्ये करण्यात आली होती. प्रधानमंत्री-आयुष्मान भारत हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर मिशनअंतर्गत देखरेख युनिट प्रस्तावित आहे. आरोग्य विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्राने या केंद्रासाठी जागा मंजूर केली आहे. यासंदर्भात महापालिका, राज्य आणि केंद्र यांच्यात सामंजस्य करारही करण्यात आला आहे.
................................
एमएसयू स्थापनेचा मुख्य उद्देश एकात्मिक आरोग्य माहिती प्लॅटफॉर्म (आयएचआयपी) द्वारे खासगी आणि सार्वजनिक आरोग्य सुविधांना जोडणे आहे. यामुळे शहरी भागातील संसर्गजन्य रोगांवर देखरेख आणि निगराणी करणेदेखील शक्य होईल.
– डॉ. संजीव कुमार, अतिरिक्त आयुक्त, महापालिका

आउटब्रेक किंवा महामारीच्या आजारांवरील कृती करण्यासाठी रिअल-टाइम डेटा आणि विश्लेषण ठेवण्यासाठी हे अत्यंत आवश्यक युनिट आहे जे संकटाचा सामना करण्यासाठी धोरणे बनवण्यात मदत करते. येथे अशा मनुष्यबळाची नियुक्ती करणार आहोत ज्यांना आयएचआयपीवर डेटा रिपोर्टिंगसाठी प्रशिक्षित केले जाईल. झुनोटिक रोगांसाठी संबंधित नमुने गोळा करण्याचे उद्दिष्ट असेल. प्रयोगशाळेसाठीचा निधी केंद्र सरकार पालिकेला देत आहे. प्रकल्पाचे अंदाजपत्रक राज्य आणि केंद्र सरकारच्या पातळीवर मंजुरीच्या प्रक्रियेत असल्‍याची माहिती महापालिका अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी दिली आहे.

तज्‍ज्ञांकडून स्‍वागत
पालिकेने हे पाऊल आधीच उचलायला हवे होते, असे नमूद करून आरोग्य तज्ज्ञांनी या उपक्रमाचे स्वागत केले आहे. कोविड विषाणूमधील उत्परिवर्तन लक्षात घेता, महाराष्ट्र आणि भारतभर अशा प्रकारचे पाळत ठेवणारी युनिट्स स्थापन करणे ही काळाची गरज आहे, असेही मत तज्‍ज्ञांनी व्‍यक्‍त केले आहे.

प्रयोगशाळेत होतील या गोष्‍टी
या प्रयोगशाळेत वरिष्ठ एपिडेमियोलॉजिस्ट, मायक्रोबायोलॉजिस्ट, व्हायरोलॉजिस्ट, वैद्यकीय अधिकारी, वरिष्ठ सांख्यिकीतज्ज्ञ, सहायक महामारीशास्त्रज्ञ, डेटा विश्लेषणासाठी आयटी सल्लागार, संशोधन सहायक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, मलेरिया पर्यवेक्षक, कीटक संग्राहक आणि इतर लिपिक कर्मचारी यांचा समावेश आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.