पाण्यासाठी दीड किलोमीटरची पायपीट

पाण्यासाठी दीड किलोमीटरची पायपीट

मोखाडा, ता. ८ (बातमीदार) : मोखाडा तालुक्यातील मुख्य बाजारपेठ असलेल्या खोडाळा ग्रामपंचायतीमधील लोकप्रतिनिधींमध्ये समन्वय नसल्याने गावात गेल्या दहा दिवसांपासून कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली आहे. नळ पाणीपुरवठा योजनेची मोटर जळाल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे. त्यावर उपाययोजना करण्यासाठी ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य आणि ग्रामसेवक अपयशी ठरले आहेत. त्यामुळे महिलांना गेल्या दहा दिवसांपासून एक ते दीड किलोमीटर अंतरावरून डोक्यावर हंड्याने पाणी आणावे लागत आहे. परिणामी येथील नागरिक संतप्त झाले आहेत.
तीन महिन्यांपूर्वीच ग्रामपंचायत निवडणुका झाल्या आहेत. नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच आणि सदस्य गावात सोयी-सुविधा उपलब्ध करतील, अशी अपेक्षा खोडाळा ग्रामस्थांना होती; मात्र नळ पाणीपुरवठा योजनेची मोटर जळाल्याने तब्बल दहा दिवस उलटूनही ग्रामपंचायतीने कोणतीही ठोस उपाययोजना केलेली नाही. त्यामुळे महिलांना एक ते दीड किलोमीटर अंतरावरून पायपीट करत डोक्यावर हंड्याने पाणी आणावे लागत आहे. गेल्या दहा दिवसांपासून पायपीट करत डोक्यावरून हंड्याने पाणी आणून वैतागलेल्या महिलांनी थेट ग्रामपंचायत कार्यालयाला धडक दिली. आम्हाला पाणी कधी मिळणार, असा प्रशासनाला जाब विचारला. त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाची पाचावर धारण झाली आणि काही काळ गोंधळही उडाला होता.

--------------------
ग्रामसेविकेचा नाशिकमधून कारभार
शासन निर्णयानुसार गावाचा कारभार हाकणाऱ्या प्रमुख अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मुख्यालयाला थांबणे बंधनकारक आहे. या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांनी दिले आहेत; मात्र तालुक्याची मुख्य बाजारपेठ असलेल्या खोडाळा ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविका सुधामती धायतडक या नाशिकमध्ये राहून गावाचा कारभार हाकत आहेत. त्यामुळे शासन निर्णय आणि जिल्हा परिषद अध्यक्षांच्या निर्देशाची पायमल्ली केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

----------------
आमच्या गावात मागील दहा दिवसांपासून पाणीपुरवठा खंडित झाला आहे. संतप्त महिलांनी ग्रामपंचायतीवर धडक दिली; परंतु आणखी १५ दिवस पाणीपुरवठा होणार नसल्याचे बेजबाबदार उत्तर प्रशासनाने दिले आहे. ग्रामपंचायतीच्या नाकर्तेपणामुळे महिलांना आणखी १५ दिवस पायपीट करावी लागणार आहे.
- प्रमिला कदम, महिला, खोडाळा

-----------
ग्रामपंचायतीने दुरुस्त करून आणलेल्या मोटारी पुन्हा नादुरुस्त झाल्या आहेत. तसेच नवीन खरेदी केलेली मोटर उशिराने मिळणार आहे. त्यामुळे तातडीने काय उपाययोजना करता येतील यासाठी ग्रामपंचायत कमिटीची बैठक घेण्यात येत आहे.
- सुधामती धायतडक, ग्रामसेविका, खोडाळा ग्रामपंचायत

--------------
दोन वेळेस मोटर दुरुस्ती करून ग्रामस्थांची गैरसोय टाळण्याचा प्रामाणिक प्रयत्न ग्रामपंचायत प्रशासनाने केलेला आहे. वारंवार मोटारमध्ये बिघाड होत असल्याने आत्ता नवीन मोटर घेत असून लवकरात लवकर पाणीपुरवठा सुरळीत सुरू करण्याची तजवीज केली आहे.
- उमेश येलमामे, उपसरपंच, ग्रामपंचायत खोडाळा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com