अग्निशमनच्या ‘उंची’ निकषाला विरोध

अग्निशमनच्या ‘उंची’ निकषाला विरोध

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. ८ : मुंबईतील अग्निशमन दलाच्या ९१० जणांच्या भरती प्रक्रियेत उंचीच्या मुद्द्यावर स्पष्टीकरण देण्यासाठी मुंबई महापालिकेला उच्च न्यायालयाने दोन दिवसांची मुदत दिली आहे. उंचीच्या निकषातील बदलाला विरोध करत याविरोधात जनहित याचिका न्यायालयात दाखल करण्यात आली आहे; परंतु उपलब्ध माहितीनुसार आतापर्यंत चारवेळा जवानांची भरती नव्या निकषानुसार झाली आहे. चार वेळा झालेल्या भरती प्रक्रियेत १७२ सेंटिमीटर उंचीच्या निकषावरच भरती प्रक्रिया पार पडली आहे.

‘अभय अभियान ट्रस्ट’च्या माध्यमातून उच्च न्यायालयात यासंदर्भात याचिका दाखल करण्यात आली आहे. याचिकेवर मंगळवारी (ता. ७) मुख्य न्यायमूर्ती संजय गंगापूरवाला आणि न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या खंडपीठापुढे सुनावणी पार पडली. या प्रकरणात याचिकाकर्त्यांची बाजू न्यायालयाने एकून घेतली. त्यामध्ये विविध महापालिका अंतर्गत अग्निशमन सेवांमध्ये भरती प्रक्रियेसाठी उंचीचा निकष आणि राज्य अग्निशमन सेवा अकॅडमीअंतर्गत प्रशिक्षण घेणाऱ्या उमेदवारांना उंचीचा निकष, असे वेगवेगळे दाखले देण्यात आले आहेत.

सध्याच्या उंचीच्या निकषामुळे अनेक पात्र आणि अनुभवी उमेदवार भरती प्रक्रियेत अपात्र ठरत असल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी केला. याचिकाकर्त्यांचे म्हणणे एकून घेतल्यानंतर मुंबई अग्निशमन दलाला या प्रकरणात आपली बाजू मांडण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. या प्रकरणात १० फेब्रुवारीला पुढील सुनावणी पार पडणार आहे. याआधीही चार वेळा झालेल्या अग्निशमन जवानांच्या भरती दरम्यान १७२ सेंटिमीटर उंचीचा निकष असल्याने उंचीला होत असलेला विरोध टीकेल का, तसेच आताच १७२ सेंटिमीटर उंचीला विरोध का, असा संशय व्यक्त होत आहे.

भरती अंतिम टप्प्यात
अग्निशमन दलात ९१० अग्निशमन जवानांच्या भरतीसाठी रितसर जाहिरात प्रसिद्ध झाली होती. १३ जानेवारी ते ४ फेब्रुवारीपर्यंत इच्छुक उमेदवारांच्या मैदानी परीक्षा झाल्या. यामध्ये जे उमेदवार शिल्लक राहिले त्यांना टोकन नंबर देऊन ६ फेब्रुवारीपासून त्यांच्या मैदानी परीक्षाही सुरू झाल्या आहेत. यातून उमेदवारांची छाननी प्रक्रिया पूर्ण होऊन निवड झालेल्या उमेदवारांची आरोग्य चाचणी होईल. याकरिता एक महिन्याचा कालावधी लागू शकतो. पुढे पात्र उमेदवारांची निवड होऊन ६ महिने प्रशिक्षण दिल्यानंतर सेवेत सामावून घेतले जाणार आहे.

यापूर्वी झालेल्या भरती आणि निकष
१) मुंबई अग्निशमन दलात १७२ सेमी उंचीने अग्निशमन जवांनाची भरती प्रक्रियेची सुरुवात २००९ मध्ये झाली होती. त्यावेळी १९२ जवानांची भरती १७२ सेंटिमीटर उंचीने करण्यात आली २०११ मध्ये १२९ अग्निशमन जवानांची भरतीही १७२ सेंटिमीटर उंचीने करण्यात आली होती.
३) २०१२ मध्ये पहिल्यांदा १३ महिला जवानांची भरती करण्यात आली. त्यावेळी महिला उमेदवारांसाठी उंचीचा निकष १६२ सेंटिमीटर ठेवण्यात आला. त्याच वर्षी ११९ अग्निशमन जवांनाची भरती करण्यात आली होती. यावेळीही १७२ सेंटिमीटर उंचीचा नियम ठेवण्यात आला होता.
३) पुढे २०१६ मध्ये ७७४ अग्निशमन जवानांची भरती झाली. त्यावेळी महिलांना १६२, तर पुरुष उमेदवारांना १७२ सेंटिमीटर उंचीची अट घालण्यात आली होती. २०१६ नंतर आता २०२३ मध्ये होत असलेल्या अग्निशमन भरतीतही महिला आणि पुरुष उमेदवारांसाठी सारखाच उंचीचा निकष ठेवण्यात आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com