दगड खाण पुन्हा सुरू करण्याचा घाट

दगड खाण पुन्हा सुरू करण्याचा घाट

मनोर, ता. ९ (बातमीदार) : पालघर तालुक्याच्या पूर्वेकडील खडकोली वसरेच्या ग्रामस्थांनी खडकोली गावात दगडखाण सुरू करण्यासाठी विरोध दर्शवला आहे. जीआर इन्फ्रा प्रोजेक्ट कंपनीला गावात दगडखाण आणि क्रशर मशीन सुरू करण्यासाठी ना-हरकत दाखला देण्याचा घाट ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी घातल्याचा आरोप करीत ग्रामस्थांनी उपोषणाचा इशारा दिला आहे. दगडखाण सुरू करण्याला विरोध असल्याचे पत्र खडकोली वसरेच्या ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. वर्षभरापूर्वी ग्रामस्थांनी आंदोलन करून खडकोली गावात सुरू केलेली दगडखाण बंद केली होती.
खडकोली गावातील गट क्र. १८५, १७७ / अ,१७७ / ब, १८७ आणि १८ ९ या जमिनीवर दगड खाण आणि क्रशर मशीन सुरू करण्यासाठी जी आर इन्फ्रा कंपनीने पालघरच्या तहसीलदार कार्यालयात अर्ज केला आहे. पेसा क्षेत्रात दगडखाण सुरू करण्यासाठी ग्रामपंचायतीचा नाहरकत दाखला आवश्यक असल्याने तहसीलदारांनी ग्रामपंचायतीच्या अभिप्रायासह ग्रामसभेचा ठराव देण्याबाबतचे पत्र खडकोली वसरे ग्रामपंचायतीला दिले आहे; पण याला ग्रामस्थांनी विरोध दर्शवत खाण पुन्हा सुरू झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.
खडकोली गावातील दगडखाणीला २६ मार्च २०२१ ला पेसा ग्रामसभेची गणपूर्ती नसताना बेकायदेशीररीत्या ना-हरकत दाखला दिला होता. ग्रामपंचायतीने नाहरकत दिल्याने दगडखाण सुरू होऊन खाणीत मोठ्या प्रमाणात सुरुंगस्फोट सुरू झाले होते. या स्फोटांचे हादरे बसून गावाला धोका निर्माण झाल्याने ग्रामस्थांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला होता. आंदोलनात सहभागी असलेल्या आदिवासी एकता परिषदेने ३१ डिसेंबर २०२१ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार केली होती. सुनावणीअंती खाणीत दगडउत्खनन आणि वाहतुकीची परवानगी गटविकास अधिकारी यांनी १८ फेब्रुवारी २०२२ रोजी दिलेल्या अहवालाच्या आधारे रद्द करण्यात आली आहे; पण आता जी. आर. इन्फ्रा कंपनीने ही दगडखाण पुन्हा सुरू करण्यासाठी अर्ज केला आहे.
.....
मनाई आदेश देण्याची मागणी
काही दिवसांपूर्वी झालेल्या ग्रामसभेत दगडखाण सुरू करण्यासंबंधी तहसीलदारांच्या पत्राचा विषयपत्रिकेत समावेश करण्यात आला होता. गणपूर्तीअभावी ग्रामसभा तहकूब झाली होती. शुक्रवारी पुन्हा ग्रामसभा आयोजित करण्यात आली आहे. ग्रामस्थांचा विरोध असल्याने जी आर कंपनीच्या दगडखाणीला ना-हरकत दाखला देण्यासाठी ग्रामपंचायतीला मनाई करण्याचे आदेश देण्याची मागणी खडकोली-वसरे ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. ग्रामपंचायतीने दगडखाणीला परवानगी दिल्यास आमरण उपोषणाचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
...

तहसीलदारांनी दिलेल्या पत्राच्या अनुषंगाने दगडखाणीचा विषय घेण्यात आला आहे. मागची ग्रामसभा गणपूर्तीअभावी तहकूब झाली होती. शुक्रवारी होणाऱ्या ग्रामसभेत ग्रामस्थांच्या उपस्थितीत निर्णय होणार आहे. जी आर कंपनीला ना-हरकत दाखला देण्यासाठी कोणताही दबाव नाही.
- जितेंद्र संखे, ग्रामसेवक, खडकोली वसरे ग्रामपंचायत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com