
मृत पोलिस कर्मचाऱ्याच्या कुटुंबियांना ६४ लाखांची नुकसानभरपाई
ठाणे, ता. ९ (वार्ताहर) : रस्ते अपघातात मृत्यू पावलेल्या लाचलुचपत खात्याचे पोलिस कर्मचारी यांची विधवा पत्नी आणि ६ वर्षीय मुलगा यांना नुकसानभरपाई म्हणून मोटार अपघात प्राधिकरणाचे अध्यक्ष ए. जे. मंत्री यांनी ६४ लाख ११ हजार रुपये देण्याची मंजुरी दिली. बेस्ट आणि चालक यांनी संयुक्तपणे ही भरपाईची रक्कम दावा दाखल झाल्यापासून ७ टक्के व्याजदराने देण्याचा निकाल दिला.
१९ नोव्हेंबर २०१७ रोजी सकाळी ९.५० वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून पूर्वद्रुती महामार्गावर कुर्लाकडे जाणाऱ्या वाहिनीवर हा अपघात घडला होता. भांडुप परिसरात दुचाकीवरून जाणारे पोलिस कर्मचारी सचिन महाडिक यांना बेस्ट बसने धडक दिली. या अपघातात सचिन यांचा मृत्यू झाला होता. सचिन महाडिक हे लाचलुचपत खात्यात पोलिस नाईक म्हणून कार्यरत होते. मृत सचिन महाडिक यांना ३६ हजार ९३० वेतन होते. श्रुतिका सचिन महाडिक (वय ३४), अमंग सचिन महाडिक (वय ६) आणि शुभदा रमेश महाडिक (वय ६१) हे कुटुंबीय कळव्याच्या पारसिक नगर येथे राहतात. श्रुतिका या पोलिस कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत. महाडिक कुटुंबीयांच्या वतीने वकील प्रदीप टिल्लू यांनी; तर बेस्टच्या वतीने वकील शेलार यांनी प्राधिकरणासमोर युक्तिवाद केला. महाडिक कुटुंबीयांनी अपघाताबद्दल ८० लाखाचा दावा केला होता. मोटार अपघात प्राधिकरणाचे अध्यक्ष ए. जे. मंत्री यांनी निकालात ६४ लाख ११ हजाराच्या रकमेपैकी ४० लाखाची रक्कम ही मृताच्या सहावर्षीय मुलाच्या नावाने एफडी करण्याचा निकाल दिला; तर रकमेचे व्याज हे मृताच्या आईला देण्याचा निकाल दिला.