रोहा ग्रामीण भागात भात लागवडीला सुरुवात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रोहा ग्रामीण भागात भात लागवडीला सुरुवात
रोहा ग्रामीण भागात भात लागवडीला सुरुवात

रोहा ग्रामीण भागात भात लागवडीला सुरुवात

sakal_logo
By

रोहा, ता. ९ (बातमीदार) : तालुक्यातील डोलवहाल बंधारा उजवा तिरातून शेतीसाठी आवश्यक पाणीपुरवठा कालव्याद्वारे केला जात आहे. या पाण्यामुळे खांब विभागात लागवड करत असलेल्या उन्हाळी हंगामातील भातशेतीच्या कामास दमदार सुरुवात झाली आहे.
उन्हाळी हंगामात डोलवहाल बंधाऱ्यातून ४० वर्षांहून अधिक काळ रोहा व माणगाव तालुक्यात भातशेतीसाठी पाणीपुरवठा केला जात आहे. त्याच पाणीपुरवठ्यावर रोहा व माणगाव तालुक्यात उन्हाळी भातशेती हंगामामध्ये हरित क्रांती झाली आहे. ज्या शेतकऱ्यांनी शेतीसाठी पाण्याची मागणी केली आहे, त्यांना कालव्याद्वारे पाणी उपलब्ध केले जात असल्याने भातलागवडीच्या कामांना सुरुवात करण्यात आली आहे. चालू उन्हाळी हंगामातही शेतीसाठी आवश्यक पाणी योग्य कालावधीत व मुदतीत प्राप्त झाल्याने आवश्यक बि-बियाण्यांची लागवड केली जात आहे. भात लागवडीसाठी रोपेही योग्य कालावधीत तयार झाल्याने सद्यस्थितीत कामाला वेग आला आहे.

कडधान्याला प्राधान्य
४० वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या कालव्याची डागडुजी व दुरुस्तीसाठी तीन वर्षांपूर्वी शेतीसाठीचे आवश्यक पाणी बंद करण्यात आले होते. दुरुस्तीनंतर ते पुन्हा सुरू करण्यात आले. मधल्या कालावधीत भातशेती ओसाड व वाया जाऊ नये, यासाठी कडधान्यांची लागवड करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर काही भागातील शेतकऱ्यांना कडधान्य पीक घेणे सोईस्कर वाटल्याने त्यांनी कालव्याचे पाणी घ्यायचे बंद केले.

महागाई तरी भातशेती
सद्यस्थितीत वाढती महागाई, बि-बियाणे व खते यांचे वाढते दर, मजुरांची वाढती मजुरी, टॅक्टर व पॉवर ट्रेलरचे वाढते दर पाहता भातशेती करणे अवघड झाले आहे. वडिलोपार्जित व्यवसाय व भातशेती वाया जाऊ नये; तसेच हक्काचा व्यवसाय म्हणून भातशेतीचे पीक घेतले जात असल्याचे शेतकरी वर्गाचे म्हणणे आहे.