शहरात उभारले जात आहेत स्मार्ट पोल

शहरात उभारले जात आहेत स्मार्ट पोल

संदीप पंडित : सकाळ वृत्तसेवा
विरार, ता. ९ : वसई-विरार महानगरपालिका सध्या शहराच्या सुशोभीकरणावर भर देत आहे. शहरातील रस्ते, फूटपाथ, रस्त्याच्या कडेच्या भिंती यांच्या रंगरंगोटीबरोबरच त्यावर वेगवेगळी चित्रे रेखाटण्याचे काम सुरू आहे. दुसऱ्या बाजूला शहराच्या चौकाचौकात शहराचे अस्तित्व दाखवणारे पुतळे उभारत आहे. तसेच आता शहरात स्मार्ट पोल उभारण्यात येत असून या एका पोलवर अनेक सुविधा नागरिकांना उपलब्ध असणार आहेत.
वसई-विरार पालिकेने शहरात स्मार्ट पोल उभारण्याचा निर्णय घेतला आहे. हे पोल केवळ दिव्यांच्या पुरता मर्यादित न राहता त्याचा विविध कामांसाठी उपयोग केला जाणार आहे. विशेषतः उभारण्यात येणारे स्मार्ट पोल हे पब्लिक प्रायवेट पार्टनरशिप या तत्त्वावर लावण्यात येणार आहेत. या स्मार्ट पोलवर एलईडी लाईट, सीसीटीव्ही कॅमेरे, सार्वजनिक सूचना देण्यासाठी साउंड, डिजिटल जाहिरात फलक, इंटरनेट बूस्टर लावण्यात येणार आहे. याचा नागरिकांना मोठा फायदा होणार आहे. सध्या स्थितीत पालिकेच्या क्षेत्रात साधे पथदिवे आहेत. त्याचा फारसा उजेड पडत नाही त्यामुळे आता या पोलवर एलईडी दिवे बसविले जाणार आहेत. यामुळे आजूबाजूचा परिसर उजळून निघेल; याशिवाय विजेची बचतही होणार आहे. या स्मार्ट पोलवर सीसीटीव्ही कॅमेरे ही लावण्यात येणार आहेत. पोलिसांना तपासात याची मोठी मदत होणार आहे. विविध प्रकारच्या कारणामुळे इंटरनेट सेवा कोलमडून पडते अशा वेळी बसविण्यात आलेल्या इंटरनेट बूस्टरचा नागरिकांना मोठा फायदा होणार आहे. या सर्व बाबीमधून पालिकेला ही चांगले उत्पन्न मिळणार आहे.
....
असा होणार उपयोग
शहरात ३०० ठिकाणी हे स्मार्ट पोल उभारण्यात येत असून आतापर्यंत जवळपास १०० पोल उभारून झाले आहेत. शहराच्या विविध भागांत उभारण्यात येणाऱ्या या स्मार्ट पोलमुळे पालिकेला नागरिकांना घरपट्टी भरणे, पाणी येणार नसेल, तर त्याची माहिती देणे, तसेच पालिकेच्या विविध योजनांची माहिती एकाच वेळी शहरातील नागरिकांना देता येणार आहे. सध्या शहरात घरपट्टी, पाणीपट्टी भरण्याच्या सूचना देण्यासाठी रिक्षा अथवा इतर गाड्या घेऊन उद्‌घोषणा करत गल्लोगल्ली फिरावे लागत आहे. तो त्रास कमी होणार आहे, अशी माहिती पालिकेचे बांधकाम अभियंता राजेंद्र लाड यांनी दिली.
====
वसई-विरार महानगरपालिका अद्ययावत साधनांनी सुसज्ज करण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे. त्या दृष्टीने वेगवेगळे प्रयोग आम्ही करत आहोत. स्मार्ट पोलच्या माध्यमातून शहराच्या सुरक्षेवर आमची नजर असणार आहे. त्याचप्रमाणे या स्मार्ट पोलवर असणाऱ्या ध्वनियंत्रणेमुळे मुख्यालयातून एकाच वेळी सर्व शहरभर सूचना ही देण्यास मदत होणार आहे.
- अनिलकुमार पवार, आयुक्त

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com