
सायबर टोळीकडून २४ लाखांचा गंडा
नवी मुंबई, ता. ९ (वार्ताहर)ः ऑनलाईन पार्ट टाईमचे काम मिळवून देण्याच्या बहाण्याने सायबर गुन्हेगारांच्या टोळीने उलवे येथे राहणाऱ्या व्यक्तीकडून तब्बल २४ लाख रुपये उकळल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी एनआरआय पोलिसांनी आयटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे.
उलवे भागात राहणारे रविकिरण सांगडे (३३) ऐरोलीतील एका खासगी कंपनीत कामाला आहेत. सध्या त्यांचे काम वर्क फ्रॉम होम सुरू असल्याने तो घरातूनच काम करत आहेत. नोव्हेंबर महिन्यात सायबर गुन्हेगारांच्या टोळीतील रूपाली शाकर नावाच्या महिलेने रविकिरण याच्या टेलिग्राम अकाऊंटवर पार्टटाईम जॉबसाठी मेसेज पाठवला होता. रविकिरण यांनी त्यासाठी होकार दिल्यानंतर रूपालीने त्यांना ऑनलाईन रेट आणि रिव्ह्यू देण्याचे काम असल्याचे सांगितले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी सायबर टोळीने टेलिग्राम खात्यावरून त्याला मेसेज पाठवून चॅम्पियन नावाच्या टेलिग्राम ग्रुममध्ये समाविष्ट केले. तसेच काम सुरू करण्यासाठी त्याला युजरनेम देण्यात आला. त्यानंतर इंटरनेटवरून ओमेगा टुर्स नावाच्या साईटवर जाऊन त्या साईटला रेट आणि रिव्ह्यू देण्याचे काम त्याला सांगण्यात आले. रविकिरण यांनी जवळचे पैसे संपल्याने त्याने दुसरीकडून पैशांची व्यवस्था करून पुन्हा नवीन टास्कला सुरुवात केली. अशा पद्धतीने त्याने एकूण २४ लाख ८ हजार रुपये भरल्यानंतरदेखील सायबर गुन्हेगारांची टोळी त्याला पैसे परत करत नसल्याने फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.
-----------------------------------
‘ओमेगा टुर्स’च्या नावाने फसवणूक
रविकिरण याने काम सुरू केल्यानंतर त्याला पहिल्या दिवसाच्या कामाचे ८४१ रुपये त्याच्या बँक खात्यावर पाठवण्यात आले. नवीन टास्क सुरू करण्यासाठी डिपॉझिटच्या स्वरूपात पैसे भरावे लागत असल्यामुळे रविकिरण याने १० हजार रुपये पाठवून टास्क सुरू केला. त्यानंतर सायबर टोळीने त्याला आणखी काही हजाराची रक्कम पाठवून त्याचा विश्वास संपादन केला. अशा पद्धतीने रविकिरण याने लाखो रुपये भरून अनेक टास्क पूर्ण केल्यानंतर डिपॉझिट म्हणून भरलेली रक्कम व त्याच्या कामाचे पैसे मिळणार नसल्याचे त्याला सांगण्यात आले.