
उन्हाच्या तडाख्यात फळांचा आधार
वाशी, ता. ९ (बातमीदार) ः काही दिवसांच्या थंडीच्या लाटेनंतर गेल्या चार दिवसांपासून उन्हाचा पारा चढू लागला आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून दुपारी उन्हाच्या झळा जाणवू लागल्या आहे. त्यामुळे वाढत्या उष्णतेपासून बचावासाठी शीतपेय आणि फळांचा आधार आतापासूनच नागरिकांनी घेतल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
उन्हाची चाहूल लागल्यापासून तुर्भेतील एपीएमसी मार्केटमध्येदेखील फळांची आवक सुरू झाली आहे. फळ मार्केटमध्ये थंडगार, रसाळ फळांना मागणी वाढली आहे. कलिंगड, टरबूज आणि पपईची आवकही वाढली आहे. कलिंगडाच्या सेवनाने शरीरातील पाण्याची पातळी उंचावते, तसेच गारवा मिळतो. त्यामुळे उन्हाच्या तडाख्यापासून बचावासाठी कलिंगडाला मागणी वाढली आहे. त्यामुळे बाजारात एका कलिंगडाची २० ते २५ रुपये किलोने विक्री होत आहे; तर गावरान कलिंगड २५ ते ३० रुपये किलो, पपई १५ ते २० रुपये किलो दराने विकला जात आहे.
---------------------------------
१०० ते १५० गाड्यांची आवक
महाराष्ट्रासह तमिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक येथून कलिंगडांची आवक सुरू झाली आहे. सध्या बाजारात टरबूज, पपई आणि कलिंगडच्या १०० ते १५० गाड्यांची आवक सुरू आहे. महिनाअखेपर्यंत ही आवक वाढण्याचे संकेत व्यापाऱ्यांनी दिले. बाजारात शुगरबेबी आणि नामधारी कलिंगडाची आवक सुरू आहे.
---------------------------------
फळांच्या विक्रीत वाढ
बाजारात हिरवी व काळी द्राक्षे, नागपूरची संत्री, हिरवी बोर आणि इतर राज्यातून येणाऱ्या सफरचंदाची आवकदेखील वाढली आहे. त्यामुळे रेल्वे स्थानकांबाहेर एप्रिल महिना उजाडण्यापूर्वीच कलिंगड, अननस, चिकू या फळांची आणि लिंबू पाण्याची दुकाने थाटली आहेत.