दावडी जिल्हा परिषद शाळा शिक्षकाविना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दावडी जिल्हा परिषद शाळा शिक्षकाविना
दावडी जिल्हा परिषद शाळा शिक्षकाविना

दावडी जिल्हा परिषद शाळा शिक्षकाविना

sakal_logo
By

टिटवाळा, ता. ९ (बातमीदार) : कल्याण तालुक्यातील दावडी जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान सुरू आहे. या शाळेत दोन शिक्षक नियुक्त केलेले आहेत; मात्र दोन्ही शिक्षक रजेवर गेले आहेत. त्यामुळे पुरशी विद्यार्थीसंख्‍या असून शिक्षकच नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. शाळेत शिक्षकच नसल्‍याने त्रस्त झालेल्या पालकांनी आणि माजी नगरसेवक जालिंदर पाटील यांनी शाळेला टाळे लावण्याचा इशारा दिला आहे.
कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत असणाऱ्या दावडी गावातील जिल्हा परिषद शाळेचा कारभार ठाणे जिल्हा परिषद प्रशासनाकडून पाहिला जातो. कल्याण पंचायत समितीचा शिक्षण विभाग यावर नियंत्रण करत आहे. या शाळेची विद्यार्थी पटसंख्या दोन वर्षांपूर्वी दीडशेहून अधिक होती; आता ती फक्त ५८ इतकी राहिली आहे. पहिली ते सातवीपर्यंत वर्ग असणारी ही शाळा विद्यार्थ्यांविना ओस पडत आहे. यांस शिक्षक आणि तालुका पंचायत समितीचा शिक्षण विभागदेखील जबाबदार आहे, असा आरोप माजी नगरसेवक जालिंदर पाटील यांनी केला आहे. येथील एक शिक्षक गेली दोन वर्षे रजेवर आहेत. एक शिक्षक अधूनमधून रजेवर जात असल्‍याचे पाटील यांनी सांगितले. शाळेत मुलांना शिकविण्‍यासाठी शिक्षकच नसल्याने विद्यार्थी शाळेत कशाला येतील, असा संतप्‍त सवाल पालक राहिबाई पाटील यांनी केला आहे.
---------------------------------------------------
शाळेतील मुले त्रस्त
दावडी जिल्हा परिषदेच्या शाळेची इमारत बहुमजली आहे. विद्यार्थ्यांसाठी आवश्यक पायाभूत सुविधा येथे उपलब्ध आहेत. शिक्षक येत नसल्‍याने पालकांनी या शाळेतून विद्यार्थ्यांची नावेच काढून आपल्या पाल्‍यांना अन्य शाळेत दाखल केले आहे. मात्र, खासगी शाळांची फी न परवडणारे पालक आणि त्यांची मोठ्या संख्येने असणारी शाळेतील मुले आज त्रस्त आहेत.
--------------------------
कोट
दावडी शाळेतील शिक्षक रजेवर आहेत; मात्र अन्य शाळेतील पर्यायी शिक्षक उपलब्ध करून दिले जातात. त्‍यामुळे कोणतीही अडचण येत नाही.
- विद्या नाईकवडे, शिक्षण विस्तार अधिकारी, कल्याण पंचायत समिती