कराचा धनादेश न वटल्यास फौजदारी गुन्हा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कराचा धनादेश न वटल्यास फौजदारी गुन्हा
कराचा धनादेश न वटल्यास फौजदारी गुन्हा

कराचा धनादेश न वटल्यास फौजदारी गुन्हा

sakal_logo
By

भाईंदर, ता. ९ (बातमीदार) : मिरा भाईंदर महापालिकेचा मालमत्ता कर धानादेशाद्वारे भरणा करणाऱ्‍या काही मालमत्ताधारकांचे धनादेश बँकेत न वटताच परत आले आहेत. याची गंभीर दखल आयुक्त दिलीप ढोले यांनी घेतली आहे. त्यानुसार आता धनादेश न वटणाऱ्‍यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.
मालमत्ता कराची शंभर टक्के वसुली करण्याचे उद्दिष्ट आयुक्तांनी दिले आहे. त्यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्‍यांकडून घरोघरी जाऊन वसुली करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. यादरम्यान अनेक मालमत्ताधारकांनी कराचा भरणा करण्यासाठी दिलेले धनादेश बँकेत न वटताच परत येत आहेत. आतापर्यंत सुमारे एक कोटी चाळीस लाख रुपये रकमेचे ५०१ धनादेश परत आले होते. मात्र संबंधित मालमत्ताधराकांना कारवाई करण्याचा इशारा दिल्यानंतर त्यातील ऐशी टक्के मालमत्ताधारकांनी एक कोटी २५ लाख रुपयांचा कराचा दंडासहित रोख भरणा केला आहे. मात्र त्यानंतरही काही मालमत्ताधारकांकडून न वटलेल्या धनादेशांची सुमारे पंधरा लाख रुपयांची रक्कम भरण्यास चालढकल सुरू असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे.
धनादेश न वटलेल्या या सर्व मालमत्ताधारकांनी येत्या तीन दिवसांत कराचा ऑनलाईन अथवा रोख स्वरूपात भरणा करावा, असे आवाहन करण्यात आले आहे; अन्यथा निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्टमधील तरतुदीनुसार संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश आयुक्त दिलीप ढोले यांनी दिले आहेत.