दफनभूमीच्या रस्ताकामात आडकाठी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दफनभूमीच्या रस्ताकामात आडकाठी
दफनभूमीच्या रस्ताकामात आडकाठी

दफनभूमीच्या रस्ताकामात आडकाठी

sakal_logo
By

मनोर, ता. १४ (बातमीदार) : मुंबई-अहमदाबाद महामार्गालगतच्या टेन ग्रामपंचायत हद्दीतील मुस्लिम दफनभूमीपर्यंतच्या रस्त्याच्या कामाला आडकाठी निर्माण केल्याने रस्त्याचे काम बंद पडले आहे. टेन गावातील वादग्रस्त जागेत कंटेनर टाकून राहणाऱ्या मिरा-भाईंदर येथील काही व्यक्तींनी अडथळा निर्माण केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून रस्त्याचे काम रखडल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे. दफनभूमीच्या रस्त्याची दुरवस्था झाल्याने खड्डेमय रस्त्याने अंत्ययात्रा काढावी लागते. शेतीच्या कामाला जाण्यासाठी शेतकऱ्यांची गैरसोय होत असल्याने रस्त्याचे काम तत्काळ सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे.

टेन गावातून दफनभूमीकडे जाणाऱ्या अडीचशे मीटर लांबीच्या रस्त्याची दुरवस्था झाल्याने मुस्लिम वस्तीमधील मृत व्यक्तींच्या अंत्ययात्रेदरम्यान ग्रामस्थांना गैरसोयीचा सामना करावा लागत होता. दफनभूमीच्या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात होती. ग्रामस्थांच्या मागणीनुसार दफनभूमी रस्त्याच्या मजबुती करण्यासाठी चोवीस लाखांचा निधी उपलब्ध झाला होता. रस्त्याच्या कामाला निधी उपलब्ध होऊन निविदा प्रक्रिया पार पडल्यानंतर २४ नोव्हेंबर २०२२ रोजी सरपंच सदू गणेशकर यांच्या हस्ते ग्रामस्थांच्या उपस्थितीत रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले होते. नोव्हेंबर महिन्यात ठेकेदाराने रस्त्याचे काम सुरू करून मोरीचे बांधकाम झाल्यानंतर रस्त्याच्या कामात आडकाठी केल्याने रस्त्याचे काम बंद पडले आहे.

------------
टेन गावातील दफनभूमीपर्यंतच्या रस्त्याचे काम अडवल्याची तक्रार आली आहे. त्यामुळे या रस्त्याचे काम पोलिस बंदोबस्तात सुरू करण्यात येईल.
- संजय कुलकर्णी, उपविभागीय अभियंता, पंचायत समिती, पालघर.