
पालिकेचे डोळ्यांसाठी मल्टीस्पेशालिटी रुग्णालय
भाग्यश्री भुवड : सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ९ : कामाठीपुरा येथील सिद्धार्थ अर्थात मुरली देवरा या पालिकेच्या नेत्र रुग्णालयाच्या जागेत एक नवीन मल्टिस्पेशालिटी रुग्णालयाच्या बांधकामाला डिसेंबर महिन्यापासून सुरुवात झाली. या मल्टिस्पेशालिटी रुग्णालयातील तिसरा आणि चौथा मजला हा फक्त डोळ्यांवरील उपचारासाठी असणार आहे. या ठिकाणी तज्ज्ञ डॉक्टर अवघड आणि मोठ्या शस्त्रक्रिया करणार आहेत.
कामाठीपुरा येथील जुन्या तोडण्यात आलेल्या डोळ्याच्या रुग्णालयाच्या जागेवर नवीन रुग्णालय बांधले जात आहे. यासाठी महापालिकेच्या वतीने १०१.१३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. १६ मजली इमारतीचे बांधकाम २०२५ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. कामाठीपुरामध्ये अत्यंत दाटीवाटीच्या ठिकाणी या दवाखान्याची जागा होती. त्याच जागी या १०० खाटांची क्षमता असलेल्या रुग्णालयाची इमारत बांधली जात आहे; तर याच इमारतीतील दोन मजले हे नेत्र विभागासाठी दिले जाणार आहेत. या दोन मजल्यांचा खर्च अंदाजित २८ कोटी रुपये असणार आहे. २२ नोब्हेंबर २०२५ पर्यंत इमारतीचे बांधकाम पूर्ण करण्याचे लक्ष्य देण्यात आले आहे.
अत्याधुनिक शस्त्रक्रिया
मल्टिस्पेशालिटी रुग्णालयात नेत्र विभागाच्या सर्व अत्याधुनिक शस्त्रक्रिया केल्या जातील. लेझर शस्त्रक्रिया, त्यासाठी मॉड्यूलर ओटीचे बांधकामही केले जाणार आहे. सध्या या इमारतीत ‘स्कूल ऑफ ऑप्टिमीटरी’ही चालवले जाते. या रुग्णालयात लेझर रुमही सुरू होतील, असे नेत्र विभागाच्या डॉक्टरने सांगितले.
मल्टिस्पेशालिटी ओपीडी
१) रुग्णालय इमारतीच्या दोन्ही मजल्यांवर डोळ्यांशी संबंधित मल्टिस्पेशालिटी ओपीडी असणार आहे. शिवाय विविध आजारांच्या ओपीडी तयार होतील. सध्या या ठिकाणी एकत्रच ओपीडी असल्याने तेथील यंत्रणेवर कामाचा अतिरिक्त भार येतो. ओपीडीवरील भार नवीन इमारतीत दिलेल्या दोन मजल्यांमुळे ५० टक्के कमी होण्यास मदत होईल.
२) रुग्णालयात पिडियाट्रिक ओपीडी, पिडीयाट्रिक ओप्थॅल, रेटीना, ग्लुकोमा, कॉर्निया अशा वेगवेगळ्या ओपीडी तयार होतील. ओप्थॅल ओपीडीमध्ये बरेचसे वेगवेगळे भाग असतात, जे नागरिकांना माहिती नसतात; पण एखाद्या खासगी रुग्णालयात ज्या पद्धतीने ओपीडी चालवल्या जातात, तशा पद्धतीने ओपीडी आणि इतर सुविधा नागरिकांना दोन्ही मजल्यांवर मिळतील, असे पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले.
.....................................................