रेल्वे पोलीस उपनिरीक्षकाची हवालदाराने केली हत्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रेल्वे पोलीस उपनिरीक्षकाची हवालदाराने केली हत्या
रेल्वे पोलीस उपनिरीक्षकाची हवालदाराने केली हत्या

रेल्वे पोलीस उपनिरीक्षकाची हवालदाराने केली हत्या

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ९ : रेल्वे आरपीएफचे पोलिस उपनिरीक्षक बसवराज गर्ग यांची हवालदार पंकज यादव (वय ३०) याने लाकडी दांडक्याने मारहाण करत हत्या केल्याची घटना बुधवारी रात्री घडली आहे. बॅरेकमध्ये इतर पोलिस कर्मचारी उपस्थित असताना ही हत्या झाल्याने कल्याणमध्ये एकच खळबळ उडाली. हत्या करून यादव याने तेथून पळ काढला. याप्रकरणी कोळसेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होताच पोलिसांनी ४ तासांत हवालदार यादव याला पेण येथून अटक केली आहे. गर्ग यांच्या हत्येनंतर तिघांच्या हत्येचा पंकज याचा डाव होता, तो डाव पोलिसांनी उधळून लावला आहे.


अंबरनाथ रेल्वे स्थानकात पोलिस उपनिरीक्षक म्हणून बसवराज गर्ग हे कार्यरत होते. दाखल तक्रारीनुसार कल्याण पूर्वेतील सिद्धार्थनगर येथे रेल्वे आरपीएफचे बॅरेक असून या ठिकाणी गर्ग हे इतर सहकाऱ्यांसोबत राहत होते. बुधवारी रात्री गर्ग यांच्या डोक्यावर आरोपी पंकज यादवने लाकडी दांडक्याने मारहाण केली. गर्ग यांचे सहकारी त्रिपाठी यांना गर्ग यांच्या बॅरेकमधून ओरडण्याचा आवाज आल्याने त्यांनी जाऊन पाहिले असता बसवराज हे जमिनीवर पडले होते; तर आरोपी पंकज यादवने त्रिपाठी यांना धमकावत घटनास्थळावरून पळ काढला. सहकाऱ्यांनी गर्ग यांना उपचारासाठी कल्याण येथील मध्य रेल्वे रुग्णालयात दाखल केले; परंतु तेथे डॉक्टरांनी गर्ग यांना मृत घोषित केले. यानंतर दाखल तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी यादव याचा शोध सुरू केला. पोलिसांना आरोपी यादव हा पेण येथील बॅरेकमध्ये असल्याची माहिती मिळाली, त्यानुसार सापळा रचत यादवला याला अटक केल्याची माहिती कल्याण परिमंडळ- ३चे उपायुक्त सचिन गुंजाळ यांनी दिली.

---------------------
पूर्ववैमनस्यातून हत्या कट
पोलिस उपनिरीक्षक गर्ग व हवालदार यादव हे २०१९ मध्ये कल्याण येथे कार्यरत होते. यावेळी आरोपी यादव आणि त्याचे काही सहकारी या दोघांत भांडण झाले असताना त्याची चौकशी गर्ग यांनी केली होती आणि त्यात आरोपी यादव याची ४ वर्षांची पदोन्नती व पगारवाढ ही कमी करण्यात आली होती. या चौकशीत गर्ग यांच्याव्यतिरिक्त पोलिस निरीक्षक बर्वे, माने आणि हवालदार घरत यांनीही याची चार्जशीट बनवण्यासाठी मदत केली होती. त्या तिघांचा राग यादव याला होता. गर्ग यांची हत्या केल्यानंतर बर्वे, माने व घरत या तिघांनाही संपवण्याचा डाव यादव याने रचला होता.