मिरा-भाईंदरमध्ये करवाढीचे संकट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मिरा-भाईंदरमध्ये करवाढीचे संकट
मिरा-भाईंदरमध्ये करवाढीचे संकट

मिरा-भाईंदरमध्ये करवाढीचे संकट

sakal_logo
By

भाईंदर, ता. ९ (बातमीदार) : मुंबई महानगर क्षेत्रातील अन्य महापालिकांची तुलना करता मिरा-भाईंदर महापालिकेकडून आकारले जाणाऱ्‍या विविध करांचे दर हे सर्वात कमी असल्याचे स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर आगामी वर्षात प्रशासनाकडून करात वाढ केली जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
प्रशासनाकडून आगामी अर्थसंकल्प तयार करण्याचे काम सुरू आहे. आगामी वर्षात उत्पन्न वाढविण्याचे मोठे आव्हान प्रशासनापुढे आहे. त्यामुळे करात वाढ करण्यावाचून प्रशासनाला अन्य पर्याय शिल्लक राहिलेला नाही. प्रशासनाने आगामी वर्षासाठी रस्ते कर हा नवा कर लागू करण्याचा निर्णय याआधीच घेतला आहे. तसेच मालमत्ता कर, पाणी कर, परवाना शुल्क आदी करांबाबतचा अन्य महापालिकांचा आढावा घेण्याच्या सूचना आयुक्तांनी प्रशासनाला दिल्या होत्या, त्यानुसार मिरा-भाईंदर महापालिका आकारत असलेल्या सर्वच करांचे दर हे अन्य महापालिकेच्या तुलनेत कमी असल्याचे आढळून आले आहे.
उदाहरण द्यायचे झाल्यास महापालिका आकारत असलेल्या मालमत्ता कराच्या वार्षिक भाडेमूल्यासाठी प्रतिचौरस फुटांचा दर हा दोन रुपये ४० पैसे इतका आहे, तर ठाणे महापालिकेत हा दर चार रुपये ८० पैसे, पनवेल महापालिकेत चार रुपये २६, तर कल्याण-डोंबिवली महापालिकेकडून दोन रुपये ४२ पैसे इतका दर आकारला जातो. त्याचबरोबर या वार्षिक भाडेमूल्यावर आकारण्यात येणाऱ्‍या कराच्या दरातही मोठा फरक दिसून आला आहे. ठाणे महापालिकेकडून वार्षिक भाडेमूल्यावर आकारण्यात येणारा दर १०२ टक्के, पनवेल महापालिकेकडून ४० टक्के, कल्याण डोंबिवली महापालिकेकडून ७०.५० टक्के, तर मिरा भाईंदर महापालिकेकडून ५८ टक्के कर आकारला जातो. त्यामुळे महापालिकेला मालमत्ता करातून मिळणारे उत्पन्न अन्य महापालिकांच्या तुलनेत खूपच कमी आहे.
...
पाच वर्षे कर जैसे थे
महापालिकेने याआधी २०१८ मध्ये करात वाढ केली होती. त्यानंतर गेल्या पाच वर्षांत करवाढ झालेली नाही. हाच प्रकार पाणी कर, परवाना शुल्क व अन्य करांच्या बाबतीतही आहे. त्यामुळे या करात वाढ करण्यासंदर्भात प्रशासनाकडून गांभीर्याने विचार सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. महापालिकेचे उत्पन्न कशा पद्धतीने वाढेल यावर अभ्यास करण्यासाठी आयुक्तांनी आर्थिक सुधारणा समितीची स्थापना केली आहे. इतर महापालिकांतील करामध्ये व मिरा-भाईंदर महापालिकेकडून आकारल्या जाणाऱ्‍या करामध्ये असलेल्या तफावतीची आकडेवारी आता या समितीपुढे सादर झाली आहे. त्यावर समितीकडून आयुक्तांकडे करात वाढ करायची की नाही यासंदर्भात शिफारस केली जाणार आहे.

..........
सर्व महापालिकांमध्ये आकारण्यात येणाऱ्‍या विविध करांच्या दराचा तुलनात्मक अभ्यास सध्या सुरू आहे. या संदर्भातला सविस्तर अहवाल आयुक्तांना सादर करण्यात येईल. त्यानंतर आयुक्त त्यावर योग्य तो निर्णय घेतील.
- संजय शिंदे, उपायुक्त, कर विभाग