कल्याण डोंबिवलीला फेरीवाल्यांचा फास

कल्याण डोंबिवलीला फेरीवाल्यांचा फास

Published on

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ९ : उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार रेल्वे स्थानक परिसारत १५० मीटर अंतरापर्यंत व्यवसाय करण्यास फेरीवाल्यांना मनाई आहे. मात्र सांस्कृतिक शहर म्हणून ओळख असलेल्या डोंबिवली, कल्याणमध्ये सर्व नियम धाब्यावर बसवून फेरीवाल्यांनी आपले बस्तान बांधले आहे. गेल्या काही वर्षांपासून फेरीवाल्यांचा हा फास वाढतच असून, त्यामुळे नागरिकांना कोंडीचा सामना करवा लागत आहे. सायंकाळी ऐन गर्दीच्या वेळी फेरीवाले आणि गर्दीमुळे सर्वसामान्यांना चालणेही मुष्कील होत आहे.
कल्याण रेल्वे स्टेशन हे जंक्शन तर डोंबिवली हे सर्वाधिक गर्दीचे रेल्वे स्थानक आहे. यामुळे या भागात प्रवाशांची गर्दी असते. स्थानक बाहेरच रिक्षा आणि फेरीवाल्यांचा विळखा पडल्याचे दिसून येते. स्टेशन परिसरातील कोंडी टाळण्यासाठी स्कायवॉकची उभारणी करण्यात आली. मात्र या स्कायवॉकवर देखील फेरीवाल्यांनी अतिक्रमण केले. कल्याण स्टेशन परिसरात स्मार्ट सिटी अंतर्गत उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. त्यात रिक्षा, बस, दुचाकी यांचा पडलेला वेढा आणि उर्वरित जागा फेरीवाल्यांनी व्यापल्याने प्रवाशांना चालण्यास जागा उरत नाही. ही कोंडी फोडण्यासाठी केडीएमसी प्रशासनाने वाहतूक बदल, कारवाई यांसारखे अनेक प्रयत्न केले मात्र ते असफल ठरले.
फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करत त्यांना व्यवसायासाठी पर्यायी जागा देण्याचा मुद्दा गेली अनेक वर्षे प्रलंबित आहे. फेरीवाल्यांविषयी तक्रार येताच अधूनमधून कारवाई केली जाते. पण अनेकवेळा फेरीवाल्यांवर राजकीय दबावामुळे कारवाई होत नसल्याचे बोलले जाते. याच डोळेझाक प्रकारामुळे काही वर्षांपूर्वी फेरीवाल्यांमध्येच गँगवॉर झाल्याच्या घटना डोंबिवलीत घडल्या होत्या. त्यानंतर काही काळ फेरीवाल्यांवर कारवाईही करण्यात आली. पण या कारवाईमध्ये सातत्य नसल्यामुळे स्थानक परिसर फेरीवाल्यांनी व्यापला आहे.


मुंबईतील फेरीवाल्यांची घुसखोरी
नेहरू रस्ता, चिंतामणी गल्ली, कामत मेडीकल पदपथ, मधूबन गल्ली, रामनग्र, राजाजी पथ, मानपाडा रस्ता, फडके रस्ता यासह कल्याण, डोंबिवलीतील गल्ली बोळयातही फेरीवाल्यांनी आपले बस्तान वाढवले आहे. विशेष करून या फेरीवाल्यांमध्ये गेल्या काही वर्षांपासून मुंबई, ठाण्यातील फेरीवाल्यांनीही घुसखोरी केली असल्याचे दिसून येत आहे.

चपलांपासून टोपीपर्यंत सबकुछ
स्थाकाजवळील काही भागात भाजीपाला विकला जातो. बाकी सर्व ठिकाणी मात्र चपलांपासून टोपीपर्यंत, कपड्यांपासून, पर्स, दागिन्यांपर्यंत सर्वकाही फेरीवाल्यांकडे माफक दरात मिळत आहे. एखाद्या मॉल व्यवस्थापनालाही लाजवेल असे सर्व साहित्य मधुबन गल्लीमध्ये मिळत आहे. त्यामुळे सुट्टीच्या दिवशी या गल्लीमध्ये जणू जत्राच भरत असल्याचे दिसते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.