
पाण्यासाठी ‘तीन वेळ घंटा’ वाजवण्याचा विसर
मुंबई, ता. ९ : अभ्यास, खेळ यामध्ये व्यग्र असल्याने विद्यार्थी पाणी पिण्याकडे दुर्लक्ष करतात. त्यांना पाण्याची आठवण करून देण्यासाठी शाळेत तीन वेळा घंटा वाजवण्याचे परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे; मात्र अधिकाऱ्यांच्या चालढकलपणामुळे मुंबई पालिकेच्या कोणत्याही शाळेत या निर्णयाची अद्याप अंमलबजावणी सुरू झालेली नसल्याचा आरोप होत आहे.
दिवसभरात ठराविक वेळेच्या अंतराने आवश्यक प्रमाणात पाणी पिणे हे आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक आहे. अन्न पचविणे, रक्ताचे वहन सुलभ करणे, पोषण मूल्ये सर्व अवयवांपर्यंत पोहोचविणे, शरीरातील सर्व विषारी द्रव्यांचे विर्सजन करणे, शरीराचे तापमान समतोल राखणे आदी महत्त्वपूर्ण कार्य शरीरातील पाणी करीत असते. विद्यार्थी दशेत लहान मुलांचा दिवसातील ५ ते ७ तासांचा कालावधी शाळेत जातो. या कालावधीत त्यांनी किमान तीन वेळा पाणी पिणे आवश्यक आहे. मुले अभ्यास, खेळ यामध्ये गुंग असल्याने पाणी पिणे टाळतात.
केरळमध्ये शाळकरी विद्यार्थ्यांना पाणी पिण्याची आठवण करून देण्याकरिता एका सत्रात तीन वेळा घंटा वाजविण्यात येते. हीच संकल्पना मुंबईतील शाळांमध्ये राबविणे अगत्याचे असल्याची ठरावाची सूचना शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तत्कालीन नगरसेवक सचिन पडवळ यांनी २०१९ मध्ये पालिका सभागृहात मांडली होती. त्यास पालिका आयुक्तांनी मान्यता देत शाळांमध्ये घंटा वाजवण्यासंदर्भात परिपत्रक प्रसिद्ध केले आहे; मात्र शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी या सूचनेची अंमलबजावणी केली नाही. त्यामुळे एक आरोग्यवर्धक उपक्रम रखडवला जात असल्याचा आरोप केला जात आहे.