
प्रस्तावित अर्थसंकल्पात उड्डाण पुलांकरता तरतूद करा
विरार, ता. १२ (बातमीदार) : नागरिकांची वाढती मागणी लक्षात घेऊन वसई-विरार शहरातील वाढती वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी नालासोपारा पूर्व-पश्चिम (श्रीप्रस्थ) व वसई रेंज ऑफिस ते एव्हरशाईन सिटी या भागाला जोडणाऱ्या उड्डाण पुलांच्या निर्माणाकरता या वर्षीच्या अर्थसंकल्पात तरतूद करण्यात यावी, अशी मागणी माजी विधानसभा सदस्य विवेक पंडित यांनी केली आहे. या मागणीकरता पंडित यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र दिले आहे. वसई-विरार शहर महापालिका कार्यक्षेत्राची लोकसंख्या २०११ च्या जनगणनेनुसार १२.२३ लाख व सध्याची अंदाजे २४ लाख इतकी आहे. मुंबई महानगरालगत येत असल्याने वसई-विरारचे झपाट्याने शहरीकरण होत आहे. वाहनांच्या संख्येतही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. महापालिका क्षेत्रात पश्चिम रेल्वेची विरार, नालासोपारा, वसई रोड व नायगाव ही चार रेल्वेस्थानके येतात. पूर्व-पश्चिमेस जोडणाऱ्या अस्तित्वातील रेल्वे उड्डाण पुलांची संख्या खूपच कमी असल्याने या पुलांवर वाहतुकीचा ताण येत आहे. त्यामुळे सर्वसाधारण सभेत नालासोपारा, निळेमोरे येथील ओस्वाल नगरी येथे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत नव्याने उड्डाण पूल विकसित करण्याकामी यापूर्वी महापालिकेने मान्यता दिलेली आहे. त्यामुळे या उड्डाण पुलांच्या निर्माणाकरता या वर्षीच्या अर्थसंकल्पात तरतूद करण्यात यावी, अशी मागणी विवेक पंडित यांनी केली आहे.