
बाल विवाहाविरोधात वसईमध्ये चार गुन्हे
विरार, ता. १२ (बातमीदार) : बालविवाह करणे हा कायद्याने गुन्हा असून यावर कारवाई करण्यासाठी शासनाने कठोर पावले उचलली आहेत. यासाठीच जिल्हास्तरावर विशेष पथक गठित करून नजर ठेवली जात आहे. अल्पवयीन बालकांच्या समस्या अधिक गुंतागुंतीच्या बनत आहेत. वसईतील तुळिंज दोन, विरार येथे १ आणि आचोळे येथे १ असे ४ बालविवाह गुन्ह्यांची नोंद आहे. बालविवाह रोखण्यात पोलिस आयुक्तालयातील पोलिसांना यश मिळाले आहे.
बालविवाह प्रतिबंधक कायदा १९२९ मध्ये मंजूर करण्यात आला. या कायद्याप्रमाणे १८ वर्षांहून लहान मुलगी व २१ वर्षांहून कमी वयाचा मुलगा कायदेशीर विवाहासाठी योग्य नाहीत. हा कायदा सर्व धर्मांना लागू आहे. बालविवाहांची माहिती १०९८ या क्रमांकावर चाइल्ड लाइनला फोन करून कळवता येते. दरम्यान, बालविवाह रोखणे शक्य होत नसेल, तर त्याची निदान माहिती पोलिस यंत्रणेला देण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.