
महिला सुरक्षेचे आव्हान
विक्रम गायकवाड ः सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. १२ : नवी मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचा आलेख दिवसेंदिवस वाढत आहे. २०२२ या वर्षामध्ये महिलांशी संबंधित बलात्कार विनयभंग, हुंडाबळी, छळवणूक, अपहरण त्याचप्रमाणे छेडछाडीचे तब्बल १,०३६ गुन्हे घटले असून गेल्या वर्षाच्या तुलनेत हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने महिलांच्या सुरक्षेचे आव्हान नवी मुंबई पोलिसांसमोर आहे.
नवी मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत २०२१ मध्ये बलात्काराच्या २१२ घटना घडल्या होत्या, त्यापैकी २११ गुन्हे उघडकीस आले होते. मात्र, २०२२ या वर्षामध्ये नवी मुंबईत २२६ बलात्काराच्या घटना घडल्या आहेत. यावरुन गेल्या वर्षाच्या तुलनेत २०२२ मध्ये बलात्काराच्या गुन्ह्यामध्ये १२ ने वाढ झाल्याचे दिसून येत आहे. २०२२ मध्ये अल्पवयीन मुलींवरील लैंगिक अत्याचाराचे (पोक्सो) १३१ गुन्हे दाखल झाले असून २०२१ च्या तुलनेत अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराच्या घटनेत २६ ने वाढ झाल्याचे दिसत आहे. पोलिसांनी सर्व गुन्ह्यांची उकल करण्यात यश मिळवले असले तरी गुन्ह्यांमध्ये झालेली वाढ चितांजनक आहे.
-----------------------------------
विनयभंगाच्या गुन्ह्यात वाढ
नवी मुंबई शहरात २०२१ मध्ये विनयभंगाचे २१४ गुन्हे दाखल झाले आहेत. त्यातील २०७ गुन्हे उघडकीस आले होते. तर २०२२ मध्ये २५१ विनयभंगाचे गुन्हे घडले असून त्यातील २३९ गुन्हे उघडकीस आले आहेत. या आकडेवारीवरून विनयभंगाच्या गुन्ह्यात देखील ३७ ने वाढ झाल्याचे दिसून येत आहे. गत २०२१ मध्ये महिलांच्या छेडछाडीचे २६ गुन्हे दाखल झाले होते, त्यापैकी २३ गुन्हे उघडकीस आले होते. तर २०२२ मध्ये महिलांच्या छेडछाडीचे ३८ गुन्हे दाखल असून यातील २८ गुन्हे उघडकीस आले आहेत.
़़़़़़़़़़़़़ः-------------------------------------
हुंडाबळीच्या प्रकारांमुळे चिंता
२०२१ या वर्षामध्ये हुंडाबळी आणि विवाहितेच्या छळवणुकीचे १९१ गुन्हे दाखल झाले होते. तर २०२२ या वर्षात हुंडाबळी आणि विवाहितेच्या छळवणुकीचे २२६ गुन्हे घडल्याची नोंद आहे. यावरुन महिलांवरील कौटुंबिक हिंसाचाराच्या (छळवणुकीच्या) घटनांमध्ये देखील वाढ झाल्याचे दिसत आहे. त्यात कौटुंबिक तक्रारींमधील वाढ कुटुंबव्यवस्थेला धक्का देणारी ठरत आहे.
----------------------------------------
अपहरणाच्या २५३ घटना
नवी मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतून २०२२ या वर्षामध्ये २५३ अल्पवयीन मुलींचे व महिलांचे अपहरण झाल्याची नोंद विविध पोलिस ठाण्यात झाली आहे. त्यापैकी २१९ अपहरणाचे गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे. अपहरण झालेल्या मुलीपैकी बहुतेक मुली या १५ ते १७ या वयोगटातील असून बहुतांश मुलींना प्रेम प्रकरणातून तसेच लग्नाच्या प्रलोभनातून झाल्याचे आढळून आले आहे.
---------------------------
११ महिलांची हत्या
नवी मुंबई शहरात विविध कारणावरून ११ महिलांच्या हत्या झाल्याची नोंद आहे. यातील सर्व गुन्हे पोलिसांनी उघडकीस आणले आहेत. तसेच गत वर्षात १२ महिलांनी विविध कारणांमुळे आत्महत्या केल्याची नोंद आहे. तसेच मानसिक आणि शारीरीक त्रास दिल्याप्रकरणी १२ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. या आकडेवारीवरून महिला विषयक गुन्ह्यात वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
----------------------------------------------
महिलांविषयक गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत असून त्यासाठी स्पेशल ड्राईव्ह घेण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने वेगवेगळे उपक्रम देखील राबवण्यात येत आहेत.
-मिलिंद भारंबे, पोलिस आयुक्त, नवी मुंबई
----------------------------------------------------
महिला अत्याचारासंदर्भात दाखल गुन्ह्यांची आकडेवारी
२०२१ २०२२
दाखल गुन्हे उघडकीस आलेले गुन्हे दाखल गुन्हे उघडकीस आलेले गुन्हे
बलात्कार २१२ २११ २३६ २३६
अपहरण २५० २३८ २५३ २१९
विनयभंग २१४ २०७ २५१ २३९
छेडछाड २६ २३ ३८ २८
छळवणूक (४९८) १९१ १९१ २२६ २२६
खून १६ १६ ११ ११
आत्महत्या ६ ६ ९ ९
शारीरिक छळ १० १० १२ १२
एकूण ९२८ ९०३ १०३६ ९८०