
वाहतूक कोंडीचे दिघा नवे केंद्र
वाशी, ता. १२ (बातमीदार)ः नवी मुंबईतील ट्रान्स हार्बर मार्गावरील ठाणे आणि नवी मुंबई शहराच्या प्रवेशद्वारावर निर्माणाधीन असणाऱ्या दिघा रेल्वे स्थानकांचे काम अंतिम टप्प्यात आहे. या रेल्वे स्थानकांमुळे प्रवासी वाहतुकीला मोठा आधार मिळणार आहे; पण या स्थानकाच्या परिसरात वाहनांच्या पार्किंगसाठी जागाच नसल्याने भविष्यात दिघा स्थानक वाहतूक कोंडीचे नवे केंद्र बनण्याची शक्यता आहे.
ट्रान्स हार्बर मार्गावरील प्रस्तावित दिघा रेल्वे स्थानकांमुळे दिघा, विटावा, तसेच कळवा आयटी पार्कमध्ये येणाऱ्या कर्मचाऱ्यांची गैरसोय दूर होणार आहे. त्यानुसार स्थानकाचे कामदेखील जवळपास पूर्ण झाले आहे; पण या स्थानक परिसरात वाहन पार्किंगसाठी जागाच उपलब्ध नसल्यामुळे नवी मुंबई शहराचे प्रवेशद्वार असलेल्या दिघा परिसरात वाहतूक कोंडी होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. विशेष म्हणजे, दिघा रेल्वे स्थानकांत लोकल थांबण्याआधीच सकाळ संध्याकाळ वाहतूक कोंडी होत आहे. अशातच दिघा रेल्वे स्थानकांचे बांधकाम करणाऱ्या एमआरव्हीसीने एमआयडीसीकडे पार्किंगसाठी भूखंडाची मागणी केली आहे; पण एमआयडीसीकडे जागा उपलब्ध नसल्याने हा प्रस्ताव धूळखात पडलेला आहे. त्यामुळे एमआयडीसीच्या न्यायप्रविष्ट असणाऱ्या पटणी मैदानांच्या भूखंडावर तात्पुरती वाहन पार्किंग करण्याची वेळ प्रवाशांवर येणार आहे.
-----------------------------------------------
२०१७ मध्ये भूमिपूजन झालेल्या दिघा रेल्वे स्थानकाच्या कामाला प्रत्यक्षात २०१८ मध्ये कामाला सुरुवात झाली होती. अठरा महिन्यांमध्ये या स्थानकाचे काम होणार होते. पण तांत्रिक तसेच लॉकडाऊनकाळात कामगार नसल्याने स्थानकाचे काम रखडले होते. विशेष म्हणजे, विविध राजकीय पक्ष्यांच्या नेत्यांनी स्टेशनचे अनेकदा पाहणी दौरे केले आहेत; पण पार्किंगसारख्या प्रश्नाकडे दुर्लक्ष झाल्याने दिघा रेल्वे स्थानक पार्किंगविना सुरू करण्याची वेळ प्रशासनावर येणार आहे.
---------------------------------
एमआयडीसीच्या नियोजनात त्रुटी
प्रस्तावित दिघा रेल्वे स्थानकांच्या बाजूला असणाऱ्या ग्रीन वर्ल्ड या बहुमजली इमारतीच्या पाठीमागे एमआयडीसीची ट्रॅक ट्रॅर्मिनलसाठीचा राखीव भूखंड होता; पण एमआयडीसीने हा ट्रक टर्मिनल आता यादवनगर येथील मोकळ्या भूखंडावर हस्तांतरित केला; तर ट्रॅक ट्रर्मिनलसाठीच्या भूखंडाची उद्योजकांना विक्री केली आहे. सद्यस्थितीत या भूखंडावर उद्योजकांनी प्लॉट पाडले आहेत. त्यामुळे दिघा रेल्वे स्थानकाला पार्किंगसाठी जागाच उपलब्ध राहिलेली नाही.
---------------------------------------
दोन्ही प्राधिकरणाचे दावे-प्रतिदावे
दिघा रेल्वे स्थानकांच्या बाजूला असणारी एमआयडीसीच्या जागा ही पार्किंगसाठी देण्यात यावी, अशी मागणी एमआयडीसीकडे एमआरव्हीसीकडून करण्यात आलेली आहे; पण एमआयडीसीकडून यासाठी भूखंड उपलब्ध करून देण्यात आलेला नाही; तर दुसरीकडे एमआरव्हीसीने जागेसाठी मागणी केलेली आहे का नाही, यांची माहिती घेण्याचे एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी राजेंद्र बोरकर यांनी सांगितले. त्यामुळे दोन्ही प्राधिकरणांमधील हा विसंवाद भविष्यात अडचणीचा ठरणार आहे.